ताप्ती व्हॅली केळी प्रक्रिया प्रकल्पाचा देशातील 10 नाविण्यपूर्ण प्रकल्पांमध्ये समावेश

0

केळी उत्पादकांच्या मेहनतीचा गौरव -आमदार हरीभाऊ जावळे ; दिल्लीच्या पथकाकडून पाच दिवस चित्रीकरण

फैजपूर- यावल तालुक्यातील पिंपरुड येथील ताप्ती व्हॅली केळी प्रक्रिया प्रकल्पाचा देशभरातील 10 नाविण्यपूर्ण प्रकल्पांमध्ये समावेश करण्यात आल्याने केळी उत्पादकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. केळीच्या टाकाऊ खोडापासून धागा, सेंंद्रिय द्रवरुप खत, गांडूळ खत निर्मितीचा यशस्वी प्रयोग करणार्‍या ताप्ती व्हॅलीचा देशातील नाविण्यपूर्ण प्रकल्पात झालेला समावेश हा केळी उत्पादकांच्या मेहनतीचा गौरव असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले.

दिल्लीच्या पथकाकडून पाच दिवस चित्रीकरण
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून देशभरात सुरू असलेल्या हजारो प्रकल्पांमधून केंद्रीय कृषी मंत्रालयाने 10 नाविण्यपूर्ण प्रकल्पांची निवड केली असून त्यात ‘टाकाऊ केळी खोडावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती’ या नाविण्यपूर्ण प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पावर माहितीपट तयार करण्यात येत आहे. यासाठी दिल्लीतून आलेल्या पाच सदस्यीय पथकाने गत पाच दिवसांत ठिकठिकाणी चित्रिकरण केले. रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा या सातपुड्याच्या पायथ्याशी आणि तापी-पूर्णा नदीच्या परीसरात दरवर्षी सरासरी 40 हजार हेक्टरपेक्षा जास्त केळी लागवड होते. केळी घड कापणीनंतर शेतात उभे असलेले खोड कापून बांधावर फेकण्यासाठी शेतकर्‍यांना खर्च करावा लागतो. मात्र याच टाकाऊ खोडावर प्रक्रिया करून ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग या शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थेने धागा निर्मिती, सेंद्रिय द्रवरुप खत, गांडूळ खतनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील 10 नावीन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंगचा समावेश केला आहे. या प्रकल्पाची यशोगाथा दर्शवणारा माहितीपट निर्मितीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून भूमिका गिरधर यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची टीम 25 ऑक्टोबरपासून फैजपूर परीसरात तळ ठोकून होती. या टीमने प्रकल्पाचे प्रवर्तक माजी खासदार तथा आमदार हरीभाऊ जावळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉ.आर.एम. चौधरी, संचालक सुरेश धनके, हर्षल पाटील, संजय राणे, दिलीप फिरके यांनी टीमला मदत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणार माहितीपट
पथकाने सातोद, सिंदखेडा, वरणगाव या प्रकल्पाच्या केंद्रांसह भालोद येथे कृषिभूषण नारायण चौधरी व रसलपूर येथे प्रगतिशील शेतकरी सुरेश धनके यांच्या शेतात व प्रक्रियांचे तपशीलवार चित्रिकरण केले. हा माहितीपट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवला जाणार आहे.