अमळनेर। पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील धरणातील वाया जाणारे पावसाचे पाणी इंदासी धरण पिंपळकोठा येथे साठवणुकीसाठी सोडण्याची मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचेकडे केल्याने मंत्र्यांनी सकारात्मक शिफारस सचिवांकडे केली असून यामुळे परिसरातील 25 ते 30 दुष्काळग्रस्त गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात आमदार चौधरी यांनी 10 जुलै रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी संदर्भात लेखी पत्र दिले होते. तामसवाडी धरणातून दरवर्षी पावसाचे पाणी मोठया प्रमाणात वाया जात असते. सदर धरणावरून वाया जाणारे पाणी इंदासी धरण पिंपळकोठा या धरणात सोडण्याबाबत उपाय योजना होणे गरजेचे आहे.
दोन्ही धरणांमुळे परीसरातील गावांना लाभ
तामसवाडी धरण व इंदासी धरणा लगत 25 ते 30 गावांमध्ये दरवर्षी दुष्काळ जन्य परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे तामसवाडी धरणातील वाया जाणारे पावसाचे पाणी इंदासी धरण पिंपळकोठा येथे साठवणुकीसाठी सोडावे जेणे करून 25 ते 30 गावांना दुष्काळ परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. तरी वरील प्रकरणी संबंधीत अधिकार्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ आदेशीत करावे. अशी मागणी आम दा चौधरी यांनी ना. महाजन यांच्या सचिवांना देण्यात आले होते. अमळनेर मतदार संघात केलेली जलयुक्त शिवारची कामे, नाला व नदी खोलीकरण, सिमेंट बंधारे, तसेच पाडळसे धरणाचे सुरु झालेले काम, उपसा सिंचन योजनांना मिळालेली मंजुरी यासह सिंचनाची होत असलेली इतर कामे यामुळे सतत अवर्षण प्रवण मतदार संघास खरोखरच दिलासा मिळत असून यामुळे चौधरी बंधूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.