तारांगणमध्ये अत्याधुनिक यंत्रणा; पावनेदहा कोटींचा खर्च

0

आंतरराष्ट्रीय कंपनीला दिला कामाचा ठेका

चिंचवड : येथील सायन्स पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या तारांगण प्रकल्प इमारतीचे बांधकाम पुर्णत्त्वास आले असून त्यात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. टुडी – ऑप्टो मेकॅनिकल यंत्रणा बसविणे, त्याची देखभाल – दुरुस्ती आणि प्रशिक्षित मनुष्यबळासह संचलन करणे आदी कामांसाठी आंतरराष्ट्रीय कंपनीला ठेका देण्यात येणार आहे. या कामाचे बीलही अमेरिकन चलन (डॉलर) मध्ये देण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या या कामासाठी गोटोइन्क प्लॅनेटेरियम या कंपनीला 14 लाख 30 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच 9 कोटी 73 लाख रूपये दिले जाणार आहेत. तसेच देखभाल, दुरूस्तीसाठी 80 लाख रूपये दिले जाणार आहेत.

डिजीटल स्वरूपात तारांगण!
अंतराळ क्षेत्रात शहरातील विद्यार्थ्यांनी स्थान निर्माण करावे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभागही मोलाचा असावा, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये तारांगण उभारण्यात येत आहे. या तारांगणात 150 बैठक व्यवस्था असून 100 बैठक व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह आहे. याशिवाय, पुस्तक दालनाचेही नियोजन आहे. या तारांगणावर 15 मीटर व्यासाचे व गोलाकार घुमट असून त्याचा सांगाडा लोखंडी आहे. त्यावर आधुनिक काचेचे आवरण बसवण्यात येणार आहे. यामध्ये डीजिटल स्वरूपाचे तारांगण दाखवले जाणार आहे. पूर्ण लतामंडप उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व ग्रह, तारे, नक्षत्र पहावयास मिळणार आहेत. विविध लहान मोठे तारे तसेच ध्रृव तारा, नक्षत्र स्पष्टपणे पाहता येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा अवलंब करण्यात येणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात केला जाणार आहे. टप्पा एकमध्ये स्थापत्य आणि विद्युत विषयांचा तर टप्पा दोनमध्ये तारांगणासाठी आवश्यक प्रोजेक्टर, आतील डोम आदी कामांचा समावेश आहे.

निविदेला प्रतिसाद नव्हता!
तारांगण प्रकल्पाच्या 14 कोटी 64 लाख 32 हजार रुपये खर्चाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. तर, तिसर्‍यांदा केवळ एकच निविदा भरली गेली. कंत्राटदाराने 8 टक्के जादा दराने ही निविदा भरली. त्यामुळे निविदेचा विषय यापूर्वी चांगलाच गाजला होता. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून पी. के. दास अ‍ॅण्ड असोसिएशनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी सल्लागाराला प्रकल्प किमतीच्या 1.35 टक्के शुल्क देण्यात आले आहे.