नवापूर। ता लुक्यातील शेतकर्यांना कापूस पिकाचे नुकसान भरपाईचे अनुदान मिळावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आर. सी. गावीत यांनी केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवापूर तालुक्यातील शेतकर्यांना कापसाच्या पिकाची नुकसान भरपाई पोटी शासनाकडून तहसीलदार कार्यालयात अनुदान प्राप्त झाले आहे. तलाठ्यांकडुन नुकसान झालेल्या शेतकर्यांची यादी आपल्या कार्यालयात प्राप्त झालेली आहे. आता पावसाळा सुरू होण्याची वेळ येऊन ठेपली आहे, तरी शेतकर्यांना कापसाच्या नुकसानीचे अनुदान का दिले जात नाही, काही अडचणी असतील तर शासन स्तरावर सोडवून तालुक्यातील शेतकर्यांना ताबडतोब अनुदान मिळवून द्यावे. जेणे करून पेरणीचा आधीच बी बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांना त्याचा आधार मिळेल.
शेतकर्यांना शासनाच्या आधाराची गरज
मंत्री मात्र ए. सी. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणावळी करीत आहे. मंत्र्याचा गाडीवरून लाल दिवा उतरविल्याने शेतकर्यांचे भले होणार नाही. लाल दिव्याशी शेतकर्यांचे काही घेणे देणे नाही. त्यांना शासनाने आधार देण्याची गरज आहे. जो आधार बॅकांचा पैसा डुबलेल्या उद्योगपतींना दिला आहे. तरी शेतकर्यांचा व्यथा राज्य शासनाला कळवाव्यात शेतकर्यांचे कापसाचा नुकसान भरपाईचे अनुदान लवकरात लवकर शेतकर्यांना मिळवून द्यावे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
संघटना शेतकर्यांचा वतीने तीव्र आंदोलन छेडेल व होणार्या परिणाम शासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष आर. सी. गावीत, अनिल गावीत, कांतीलाल गावीत, रमेश गावीत, दिलीप गावीत, रामुवेल गावीत, मनुवेल वळवी, विरसिंग वसावे, विलास गावीत, देवजी गावीत, सेगा गावीत, धीमा गावीत, शलमोन गावीत, शांताराम कुवर, केवजी गावीत, जोकु गावीत, वसंत वसावे आदिंचा सह्या आहेत.
वीज बिल माफ करा
एकीकडे सरकार शेतकर्यांना कर्ज माफी द्यायला तयार नाही. कर्जाचा बोझा खाली दबलेल्या शेतकर्यांना ना कर्ज माफी ना वीज बील माफ केले. उलट अवाजवी बीले विद्युत वितरण कंपनी कडून आकारले जात आहे. विज बील थकबाकीदार शेतकर्यांकडुन सक्तीने वीज बील वसुल न करण्याचे आदेश असतांना देशात शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांचा वाली कोण आहे का? कृषी प्रधान देशात शेतकर्यांची कधी नव्हे एवढी अवहेलना झाली असतांना शासन शेतकर्यांचा अंत मुकाट्याने बघत आहे.