तालुक्यातील स्वस्त धान्य वितरणाचा घेतला आढावा

0

भुसावळ । सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीची बैठक तहसिल कार्यालयात गुरुवार 13 रोजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यामध्ये तालुक्यातील वितरण व्यवस्था, केरोसिनचे वाटपाचे कमी करण्यात आलेले प्रमाण तसेच गोडोऊनची धान्य साठवण्याची क्षमता, पीओएस मशीनमुळे आलेली धान्य वितरणात आलेली पारदर्शकता, तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी मोहीम, ई-रेशनकार्ड, सिलेंडर वितरण या सर्व गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

अध्यक्षांनी घेतली वितरणाची माहिती
आमदार संजय सावकारे हे बैठकीस हजर राहू न शकल्यामुळे नगराध्यक्ष रमण भोळे हे अध्यक्षस्थानी होते. तर वरणगाव नगराध्यक्षा अरुणा इंगळे, प्रभारी तहसिलदार एस.यु. तायडे, पुरवठा तपासणी अधिकारी आर.एल. राठोड, गोदाम व्यवस्थापक डी.आर. जगताप, पुरवठा निरीक्षक एम.एफ. तडवी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी धान्य पुरवठ्यासंदर्भात तसेच रेशन कार्ड संदर्भात विचारणा केली असता प्रभारी तहसिलदार तायडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. गरीबांना व्यापार्‍यांच्या नफेखोरीपासून वाचवून रास्त दरात, पुरेशा प्रमाणात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी तसेच बाजारातील भाववाढीवर अप्रत्यक्ष नियंत्रण राखण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाने रेशनिंगच्या माध्यमातून काम सुरू केले. रेशनिंगचे काम प्रभावीपणे व्हावे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत दक्षता समिती गठीत करण्यात आली असून रेशनिंग संदर्भात ही समिती महत्वाची भूमिका निभावत असल्याचे सांगितले.