शिरपूर। तापी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनिय माहिती प्रशासनाला मिळाल्यावरून नायब तहसीलदार कारवाई करण्यात घटनास्थळी गेले असता वाळू माफियांनी दमदाटी करत कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला इंडिगा कारसह अटक करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड शिवारातील तापी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करण्यात येत असल्याची माहितीच्या अनुषंगाने शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्या आदेशाने नायब तहसीलदार गणेश अढरी हे तलाठी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी कार्यवाही करण्यासाठी गेले असता शासकीय वाहन पाहून वाळू माफियांनी ट्रॅक्टरसह पळ काढला. नायब तहसीलदार गणेश अढारी यांनी आपल्याजवळील शासकीय वाहनाने ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असतांना गिधाडे फाट्याजवळ इंडिका व स्वीप्ट डिझायनर गाड्यांनी शासकीय वाहनाला अडविले व शासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वाळू माफियांचा व ट्रॅक्टरांचा पाठलाग करू नका, अशी धमकी देत दमदाटी करण्यात आली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत नायब तहसीलदार गणेश अढारी यांनी इडिंगा (एमएच- १८टी- १०७७)वाहनातील चालक प्रवीण उर्फ परू आप्पा राजपूत (रा.उप्परपिंड) याला इंडिगा गाडीसह ताब्यात घेतले. नायब तहसिलदार यांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यावर अन्य संशयितांनी घटनास्थळा वरून पळ काढला.
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार गणेश अढारी यांच्या फिर्यादीवरून प्रवीण राजपूत, अमृत पाटील, दिनेश पाटील, कल्पेश कोळी, भटू पाटील आदीं विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, अवैध गौण खनिज वाहतूक करणे तसेच covid-१९ उपाययोजनाचे उल्लंघन करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.