तासन्तास कार्यालयात रेंगाळणार्‍यांना चाप

0

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची विशेष बैठक : सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर; लवकरच निर्णय

देहूरोड । देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात काहीजण विनाकारण तासन्तास अधिकार्‍यांसमोर बसून गप्पा मारत असतात. त्यामुळे कामकाजावर परिणाम होतोच, शिवाय अधिकारीही अशा कार्यकर्त्यांना वैतागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सदस्यांनी बैठकीत अधिकार्‍यांना धारेवर धरले. अशा कार्यकर्त्यांवर अंकुश लावण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितल्यावर सदस्य शांत झाले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची विशेष बैठक गुरूवारी झाली. ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव सभेच्या अध्यस्थानी होते. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारिमुत्तू, गोपाल तंतरपाळे, ललित बालघरे, अ‍ॅड. अरूणा पिंजण तसेच विविध विभागांचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

भूमीगत गटारावरून सभेत गदारोळ
या विशेष बैठकीत पुरवणी विषयपत्रिकेवर वॉर्ड क्रमांक 3, 4 आणि 7 मधील भूमीगत गटारांच्या निवीदा मंजुरीचा विषय होता. मात्र, या ठेक्यात ठेकेदारांनी रिंग केल्याची मेहरबान सिंग या माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी याबाबत सभागृहात माहिती देताना संबंधित निवीदा रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शविला. गतवर्षीची कामे यावर्षी कुठे सुरू होण्याची चिन्हे असताना एखाद्याच्या तक्रारीवरून निवीदा प्रक्रियाच रद्द करणे अयोग्य असल्याची भूमिका सदस्यांनी मांडली. त्यावरून चांगलाच गदारोळ निर्माण झाल्यामुळे अध्यक्षांनी हस्तक्षेप करीत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

शेलारवाडी शाळेसाठी 1 कोटीचा प्रस्ताव
शेलारवाडी शाळेची इमारत धोकादायक झाल्याच्या कारणावरून ही शाळा एम. बी. कॅम्प येथील इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली. शेलारवाडी येथील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मागील दोन वर्षापासून प्रलंबीत आहे. ज्या ठिकाणी सध्याची इमारत आहे, त्याच जागी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र, ही जागा लष्कराच्या ए-वन श्रेणीतील असल्यामुळे या जागेवर इमारत बांधणीसाठी अनेक निर्बंध आले आहेत. बैठकीत याविषयावर चर्चा झाली. या जागेची श्रेणी बदलण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून नवीन इमारतीसाठी 1 कोटी 79 लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचा ठराव करण्यात आला.

रुग्णालयासाठी 18 कोटी
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने 62 खाटांची क्षमता असणार्‍या अद्यावत वैद्यकिय सेवा उपलब्ध असणार्‍या रुग्णालयाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या नियोजित कामासाठी 18 कोटी 57 लाखांच्या अंदाजीत खर्चाचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. वॉर्ड क्रमांक 4 मधील उद्यान विकसीत करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.

लवकरच जनसंपर्क कार्यालय
नागरिकांनी आपल्या तक्रारी, समस्या अडचणींबाबत यापुढे लेखी तक्रारी कराव्यात, तोंडी तक्रारी तसेच अधिकार्‍यांशी थेट बातचीत करण्याचे प्रकार करू नयेत. यासाठी स्वतंत्र जनसंपर्क विभाग सुरू करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी दिली.