तळेगाव । छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वडगाव मावळ येथील गडभटकंती ग्रुपच्या वतीने किल्ले तिकोणागड येथे दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत तिकोणागडावरील ऐतिहासिक वास्तू, ठिकाण यांचे माहिती दर्शक फलक, दिशा दर्शक फलक लावून गडाची स्वच्छता करण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन करून आपत्कालीन मदतीकरीता लागणारे साहीत्य देण्यात आले.
गडभटकंती ग्रुप सकाळी सर्व माहिती फलक घेऊन गडपाथ्याशी जमा झाला होता. फलक लावण्याकरीता आदल्या दिवशी म्हणजे रविवारीच खड्डे खोदून ठेवण्यात आले होते. त्यातील काही मावळे गडावरच मुक्कामी राहिले होते. गडावरील काही फलक हे जुने असल्याने त्यास छिद्र पाडण्याची गरज असल्याने जनरेटर आणले होते. सोमवारी सकाळी गडपाथ्यापासून फलक लावण्यास सुरुवात करण्यात आली. ठिकाणी फलक लावत गडमाथ्यावर शेवटचा फलक लावण्यात आला. गडावरील जुना भगवा झेंडा काढून त्या ठिकाणी नवीन झेंडा लावण्यात आला. गडमाथ्यावरील श्री वितंडेश्वराचे मंदिर स्वच्छ करून त्याची पूजा करण्यात आली तसेच गडावरील चपेटदान मारूती राय, वेताळ महाराज व तळजाई माता मंदिरातही हार घालुन पूजा करण्यात आली.
आपतकालीन मदतीसाठी साहित्य भेट
गडपायथ्याशी लावलेला मोठ्या माहिती फलकाजवळ शिवप्रतिमेचे पूजन व फलकाचे अनावरण करण्यात आलेे. शिवप्रतीमेचे पूजन श्रीनिवास कुलकर्णी व त्यांच्या सहकुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीनिवास कुलकर्णी यांच्या पत्नी विशाखा कुलकर्णी यांच्या हस्ते माहिती फलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले. सर्वांनी जय भवानी जय शिवराय घोषणा दिली. यावेळी गडावर आपतकालीन मदतीकरीता लागणारे फस्ट एड, व स्ट्रेचर साहित्य गडपाल माऊली मोहळ व पुंडलीक मोहळ यांच्याकडे कुलकर्णी यांच्या हस्ते सपूर्द करण्यात आले.