तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही ढासळण्याची शक्यता

0

तटबंदीने जपले गडाचे गडपण

तळेगाव दाभाडेः मावळ तालुक्यातील किल्ले तिकोना गडावरील बालेकिल्ल्यावरील तटबंदीला मोठे भगदाड पडले आहे. तटबंदीचा काही भाग पडला असल्याने उरलेला भाग केंव्हाही पडण्याची शक्यता आहे. जर ही तटबंदी ढासळली तर तटबंदीचे दगड किल्ल्याच्या रस्त्यावर पडतील. त्यामुळे गडावर जाणार्‍या पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ही तटबंदी पडली तर इतिहासाची पडझड होणार आहे. किल्ले तिकोना गडावरील बालेकिल्ल्यावर जंग्या, पाणी जाण्याचा मार्ग, बुरूज अशा अनेक गोष्टी समाविष्ट असलेली तटबंदी आहे. गडाच्या डाव्या बाजुची तटबंदी काळाच्या ओघात ऊन, वारा, पाऊस व नागरिकांसह शासनाचे दुर्लक्ष झाल्याने तिचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. परंतु उजव्या बाजूची सुंदर बुरूज आणि तटबंदी अजूनही शाबूत आहे. त्या बुरुज आणि तटबंदीने गडाचे गडपण जपून ठेवले आहे. पण त्या तटबंदीचा एक 3 ते 5 मिटर लांबीचा तटबंदीच्या खालील काही भाग बर्‍याच दिवसांपूर्वी ढासळला आहे. त्यामुळे तटबंदी आता अधातंरी राहिली आहे. आता पावसाळा सुरु असल्याने पावसाचे पाणी झिरपून ही तटबंदी कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. ही तटबंदी पडल्यास गडावर जाणार्‍या आणि येणार्‍या पर्यटकांच्या जीवाला धोका होणार आहे, अशी माहिती गडपाल अक्षय आवताडे यांनी दिली.

पर्यटकांना कल्पना नसते
तिकोना गडावर येणार्‍या पर्यटकांना या धोक्याबाबत पुसटशीही कल्पना नसते. आपण उभा राहिलेली तटबंदी कमकुवत झाली आहे. कोणत्याही क्षणी ती पडणार आहे, याबाबत पर्यटक मावळ्यांना माहिती नसते. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्यामार्फत गडावर दुर्ग संवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजवर संस्थांनी गडावरील मंदिराचा जीर्णोद्धार, तटबंदीवरील लहान मोठी झाडे काढण्यात आली. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. सध्या पुरातत्व खात्याच्या परवानगीने गडावर पायर्‍यांच्या डागडुजीचे काम सुरु आहे. त्यामुळे तटबंदीबाबत संस्थांच्या पदाधिकार्‍यांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

गडावर रोप वे गरजेचा
तटबंदी दुरुस्त करण्यासाठी येणार खर्च मोठा आहे. तसेच किल्ल्यांवर काहीही काम करायचे असल्यास त्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी मिळविणे आवश्यक असते. ही परवानगी मिळविण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. परवानगी आणि डागडुजीच्या खर्चाची व्यवस्था झाली तर तटबंदीची लागणारे साहित्य खालून वर न्यावे लागणार आहे. गडावर जाणारी वाट अगदी अरुंद असल्याने साहित्य नेण्यासाठी अडचण येणार आहे. त्यासाठी साहित्य वाहून नेणारा रोपवे बांधणे आवश्यक आहे. रोप वेसाठी आणखी वाढीव खर्चही आवश्यकता आहे. त्यासाठी शासनस्तरावर या कामाची जबाबदारी स्वीकारून इतिहासाचे संरक्षण करावे अशी मागणी गडप्रेमी व शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.