तिघ्रे गावातून एक कोटी रुपयांचा गांजा जप्त
जळगाव गुन्हे शाखेसह नशिराबाद पोलिसांची कारवाई : गांजावर आतापर्यंत सर्वाधिक मोठी कारवाई : एका आरोपीला अटक : गांजाचे धुळ्यासह मुंबई कनेक्शन
One Crore Cannabis Seized From Tighre Villages : Nasirabad Police Action With Jalgaon Crime Branch भुसावळ : नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील तिघ्रे या छोट्याशा लोकवस्तीच्या गावातून जळगाव गुन्हे शाखेसह नशिराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत तब्बल 885 किलोग्रॅम वजनाचा व एक कोटी सहा लाख 20 हजार रुपये किंमतीचा गांजा एका घरातून गोपनीय माहितीच्या आधारे जप्त केला आहे. या कारवाईने अवैधरीत्या गांजा तस्करी करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहुल काशीनाथ सूर्यवंशी (25, वाडीशेवाळे, ता.पाचोरा) यास अटक करण्यात आली आहे तर अन्य संशयीत पसार झाले आहेत. दरम्यान, गांजा तस्करीचे धुळ्यासह मुंबई कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात असून आजवर गांजावर झालेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नशिराबाद हद्दीतील तिघ्रे गावातील मनोज रोहिदास जाधव याच्या घरातून सुमारे 885 किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली तर मंगळवारी दिवसभरात यंत्रणेने पंचनाम्यासह गांज्याची मोजदाद केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आजवरच्या कारवाईत ही सर्वाधिक मोठी कारवाई असल्याची माहिती आहे तर यापूर्वी रावेरात सुमारे एक कोटींचे ब्राऊन शुगरही जप्त करण्यात आले होते. या कारवाईने अवैधरीत्या गांजा तस्करी करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली असून म्होरके मात्र अंडरग्राऊंड झाले आहेत.
यांच्या पथकाने केली गांजावर कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, एपीआय जालिंदर पळे, उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय युनूस शेख इब्राहीम, वसंत लिंगायत, रवी नरवाडे, सुनील दामोदर, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दीपक पाटील, अक्रम शेख याकुब, संदीप साबळे, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, रमेश जाधव, विजय चौधरी, दर्शन ढाकणे तसेच नशिराबाद एपीआय अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, हवालदार गजानन देशमुख, किरण बाविस्कर, रवींद्र इंधाटे, सुधीर विसपुते, समाधान पाटील, विजय अहिरे, दिनेश भोई आदींच्या पथकाने केली.
वर्षभरापूर्वी रावेरात पकडले होते एक कोटींचे ब्राऊन शुगर
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी शनिवार, 18 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेले मात्र भारतीय दरानुसार सुमारे एक कोटी रुपये किंमतीचे अर्धा किलो हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केले होते. ही जळगाव गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधातील सर्वाधिक मोठी कारवाई होती. रावेरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून या प्रकरणी अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आली होती तर तपासादरम्यान महिलेला ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्ययप्रदेश) यालाही अटक करण्यात त्यावेळी यश आले होते.