भुवनेश्वर : तितली वादळाचा तडाखा आणि मुसळधार पावसाने आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये हाहाकार माजला आहे. ओडिशामध्येच ३ लाख लोकांना या वादळाचा फटका बसला आहे. ओडिशातील गजपती जिल्ह्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण बेपत्ता आहेत. आंध्र प्रदेशातही आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
गजपती जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी बरघरा गावातील काही लोकांनी गुंफेचा आसरा घेतला होता. त्याचवेळी दरड कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण दबले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Odisha: Two Naval Chetak helicopters are dropping food supply in accessible areas of Ganjam and Gajapati districts. Food supplies are being airdropped at 19 locations in the two districts. pic.twitter.com/jF2mh7NQn0
— ANI (@ANI) October 13, 2018
गजपती आणि गंजम जिल्ह्यात वादळाने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. गजपती जिल्ह्यात युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून नौदलाचे दोन हेलिकॉप्टर्स गजपती जिल्ह्यात मदतकार्य करत असून पूरग्रस्तांना फूड पॅकेट्स व अन्य मदत पुरवली जात आहे.
दरम्यान, तितली वादळ ओडिशाची सीमा ओलांडून पश्चिम बंगालमध्ये सरकले आहे. वादळाची तीव्रताही कमी झालेली आहे. येत्या २४ तासांत पश्चिम बंगालमधील किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.