तिळगुळ घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा 

0
हिंजवडी वाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रम
हिंजवडी : मकर संक्रांतीच्यादिवशी प्रत्येकजण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांनाच तिळगुळ देतात. ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ असं म्हणत नात्यातला गोडवा टिकवून ठेवला जातो. याच पार्श्‍वभूमीवर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तिळगुळ वाटत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सर्व वाहनचालकांना केले. वाकड पुलाजवळ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘तिळगुळ घ्या, गोड बोला आणि वाहतुकीचे नियम पाळा’ असे आवाहन करत हिंजवडी वाहतूक पोलिसांनी संक्रांत साजरी केली. संक्रांतीचा सण सर्वत्र अगदी उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण एकमेकांना तिळगुळ वाटतात. पोलिसांना मात्र अशा सणांच्या वेळी सुट्टी मिळत नाही. पण साजरा करण्याचा आनंद मिळाला पाहिजे आणि कर्तव्यही पाय पडले पाहिजे, यासाठी हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी नवी टूम शोधत हा उपक्रम राबवला.
पोलीस-नागरीक संवाद वाढायला हवा
पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले की, पोलिसांचा नागरिकांशी संवाद वाढायला हवा, असे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे मत आहे. त्यामुळे यानिमित्ताने नागरिकांशी संवाद वाढून त्यांना प्रत्यक्ष वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील करता येईल. यातून हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना तिळगुळ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देत ते पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही सहभाग घेतला.