तिसर्‍या आघाडीचा प्रयत्न!

भाजपविरोधात तयार होत असलेली हवा आणि काँग्रेसची मरगळ या दोन राजकीय पातळ्यांवर देशात पुन्हा एकदा भाजप विरोधात काँग्रेसवगळता तिसर्‍या आघाडीची चाचपणी सुरु झाली आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते ममता बॅनर्जी यांचे…पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धूळ चारल्यापासून बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या आकांक्षेला नवीन पंख फुटलेले आहेत. राज्याप्रमाणे केंद्रातली भाजपची सत्ता उखडून टाकण्यासाठी कामाला लागलेल्या ममतांनी वर्ष 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

 

काही काळापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईला जाऊन भेट घेतली होती. यापाठोपाठ आता ममतांनी द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तसेच तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी संबंध वृद्धिंगत करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय नेतृत्व करण्याची इच्छा असणार्‍यांच्या यादीत आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांची भर पडली आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या कथित दडपशाहीविरुद्ध के. चंद्रशेखर राव हे सातत्याने आवाज उठवत आहेत. मोदी सरकारच्या धोरणांचा विरोध आणि देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी आपण आंदोलन करणार असल्याचे केसीआर यांनी पूर्वीच म्हटलेले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची आणि मुख्यमंत्री ठाकरे, तसेच शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारच्या मुंबई भेटीत भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर सक्षम पर्याय देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. देशात भाजपला हटवून परिवर्तन आणण्यावर आणि त्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यावर दोघांमध्ये सहमती झाली. राव हे नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटले आणि आपल्या मोहिमेला पवार यांनी आशीर्वाद दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. विशेष म्हणजे, भाजप हा लोकशाही नसलेला पक्ष असल्याचे सांगणार्‍या चंद्रशेखर राव यांचे अगदी अलीकडील काळापर्यंत भाजपसोबत चांगले संबंध होते; मात्र अलीकडच्या काळात कृषी कायदे, हिजाब विवाद अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून राव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. या सर्व घडामोडींमुळे देशात तिसर्‍या आघाडीची चर्चा होणे अपेक्षितच होते. आधीच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने भाजपाच्या तोंडाचे पाणी पळविले आहे. लोकसभेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते मात्र उत्तर प्रदेशात भाजपविरोधी वातावरण होतांना दिसत आहे. यामुळे भाजपाची डोकंदुखी वाढली आहे. यासह पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची जोरदार हवा दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ दिल्ली, पंजाब पाठोपाठ इतरत्र हातपाय पसरू पाहत आहे. गोव्यात ते चांगली टक्कर देतील, असे दिसते. प्रादेशिक पक्षांची काँग्रेसला वगळून आघाडी झाली, तर त्यावेळी केजरीवाल यांची कोणती भूमिका राहणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांनी जोरदार आघाडी उघडली असल्याचे चित्र आहे. या अनुषंगाने दिल्लीतही अनेकांच्या गाठीभेठी वाढल्या आहे. सर्वांचे लक्ष केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सक्षम पर्याय देवून भाजपाकडून सत्ता खेचून आणणे हाच आहे. यासर्व राजकीय खेळ्यांमध्ये काँग्रेस अजूनही चार हात लांबच दिसून येत आहे