तिसर्‍या आघाडीसाठी ममतांची जोरदार मोर्चेबांधणी

0

दिल्लीतील भेटीगाठीनंतर राजकीय वातावरण तापले
शरद पवार, संजय राऊतांसह विविध पक्षाच्या नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना केंद्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी देशातील विविध प्रादेशिक पक्षातील नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या. बॅनर्जी यांनी तिसर्‍या आघाडीसाठी सुरू केलेल्या या भेटीगाठींमुळे दिल्लीसह देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी यांनी शिवसेना, तेलुगू देसम पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, वायआरएस काँग्रेस पक्षांतील नेत्यांच्या भेटी घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. पवार यांना भेटण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः पवारांच्या कार्यालयात गेल्या होत्या. या भेटीचे वृत्त सुरूवातीस पवारांनी फेटाळले. परंतु, त्यानंतर मात्र भेट झाल्याचे त्यांनी मान्य केले.

तेलुगू देसमच्या खासदारांची घेतली भेट
संसदेत सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाची नोटीस बजावणार्‍या वायएसआर काँग्रेस आणि बीजू जनता दलाच्या कार्यालयात जाऊन ममता बॅनर्जी यांनी भेटी घेतल्या. डीएमकेच्या नेत्या कणिमोझी यांच्यासह एनडीए सरकारमधून बाहेर पडलेले चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमच्या खासदारांनीही ममता बॅनर्जी भेटल्यात. टीडीपी, काँग्रेससह 9 पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर या घडामोडी घडू लागल्या आहेत. तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

बड्या नेत्यांना लवकरच भेटणार..
2019ची लोकसभा निवडणूक ही रंगतदार होईल, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, ममता नवी दिल्लीत जनता दल(युनायटेड)चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांसह शिवसेना आणि तेलुगू देसमच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. विशेष म्हणजे, विरोधकांना एकत्र करण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेणार नाहीत. परंतु त्या सोनिया गांधींची भेट घेऊ शकतात. ममता या नेत्यांच्या भेटीत तिसरी आघाडीसाठी अस्तित्वात येऊ शकते का, याची चाचपणी करणार आहे. त्यांनी आरजेडीच्या खासदार असलेल्या मीसा भारती यांचीही भेट घेतली आहे.ममता बॅनर्जी 2019ची निवडणूक विरोधकांना एकत्र करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्या एक स्पष्ट अजेंडा ठेवूनच दिल्लीत दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस आघाडीचा यूपीएचा आपण भाग बनणार नसल्याचेही ममतांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसची डाव्यांसोबत आघाडी असल्याने तृणमूलने त्यांच्यासोबत जाणे योग्य नसल्याचे तृणमूलच्या एका नेत्याने म्हटले.