माथेराम : कुणाला कशाची आवड अन् कुणाला कुठल्या कलेवर प्रेम असते, जिव्हाळा असतो याचा नेम नाही परंतु चक्क माथेरानवरील अदभुत निस्सीम प्रेमापोटी निसर्गाने केलेल्या जादुई लीलेने तब्बल तीनशे वेळा माथेरानच्या पायथ्यापासून विविध वाड्यांच्या मार्गे पायी भटकंती करून पुन्हा त्याच मार्गे एकुण तीनशे वेळा पायी प्रवास करण्याचा विक्रम करणारे मुंबई (मालाड )येथील रहिवासी प्रदीप पुरोहित या माथेरान अवलियाच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथेच्छ सत्कार हॉटेल हॉर्स लँड मध्ये हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक तथा विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हॉटेल पॅनोरमाचे व्यवस्थापक बाबुनाथ रावल, माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांसह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.
प्रदीप पुरोहित हे 62 वर्षाचे गृहस्थ असुन ते 1983 पासुनच आपले परममित्र मुलराज कापडीया यांच्यासोबत पहिल्यांदा इथे आले होते तेव्हापासून इथल्या निसर्गसौंदर्याने केलेल्या त्यांच्यावरील जादुई लीलयाने ते नकळत माथेरानच्या प्रेमात पडले. मुलराज यांनी 262 वेळा पदभ्रमंती केलेली असुन त्यांच्या निधनानंतर सुद्धा पुरोहित यांनी पायी प्रवासाची आपली घोडदौड सुरूच ठेवलेली आहे. दर रविवारी ते धोदाणी मार्गे, रामबाग पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, गार्बट पॉईंट, चौक पॉईंट अथवा चक्क नेरळहून रेल्वे रूळांंवरून एकविस किमीचा पायी प्रवास करीत येतात. आणि पुन्हा त्याच मार्गे परत जातात.
माथेरानवरील आपल्या उत्कट प्रेमाची ओळख निर्माण करणारे प्रदीपभाई हे अभिनंदनास पात्र असुन अशा निसर्गप्रेमी अवलियाचा शासनाने सत्कार करणे अधिक उचित ठरेल.
-नगरसेवक, माथेरान