चाकण मधील आणखी 43 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव,
चाकण :- चाकण मध्ये अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही गुन्हेगारांना कायद्याची कोणतीच भीती राहिली नसल्या सारखी स्थिती मागील काही काळात पहावयास मिळत होती. युवकांच्या संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढल्या नंतर सातत्याने खून आणि खुनाचा प्रयत्न असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे चाकण पोलिसांनी आता बाह्या सावरल्या असून तब्बल 43 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याची व तिघांचे प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे.
एका मोक्क्याच्या प्रस्तावालाही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारी (दि.24) मंजुरी दिली आहे. दरम्यान चाकण मधील तडीपारीचे ज्यांचे प्रस्ताव मंजूर होतील त्यांना शेजारच्या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार व्हावे लागणार आहे.मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम 56 अन्वये दहशत पसरविणारी व्यक्ती आणि कलम 57 अन्वये सराईत गुन्हेगाराविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली जाते. या कायद्याचा मूळ हेतू आपापल्या भागात प्रचंड दहशत असलेल्या गुन्हेगारांपासून सामान्य जनता तसेच तक्रारकर्त्यांना निर्भय बनविणे हा आहे. गुन्हेगारी करून समाजात दहशत पसरविणार्यांना रोखण्यासाठी तडीपारी हे प्रभावी अस्त्र चाकण पोलिसांकडून बाहेर काढण्यात आले आहे.
प्रस्ताव मंजुरीच्या अखेरच्या टप्प्यात
चाकण पोलिसांकडून तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आलेल्या 43 जणांपैकी तीन जणांचे प्रस्ताव मंजूर झाले असून चार जणांचे प्रस्ताव मंजुरीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. उर्वरित प्रस्ताव पुढील महिनाभरात मंजूर करून घेण्याचे प्रयत्न चाकण पोलिसांनी चालविले आहेत. सातत्याने विविध घटना एकापाठोपाठ घडू लागल्याने गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली असून अनेकांच्या गुन्हेगारी कारवायांच्या फायलींवरील धूळ झटकायला सुरुवात करण्यात आली आहे.
गुन्हेगारांच्या नावांबाबत गुप्तता
तडीपारीचे प्रस्ताव तयार करताना कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांच्या नावांच्या बाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या काहींच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती पोलिसांकडून संकलित होत आहे. त्याच प्रमाणे कुठल्याही कायदेशीर पळवाटेने अशा कारवायांना स्थागीत्या मिळणार नाहीत याची दक्षता पोलीस प्रशासन घेत असल्याचे समजते. मागील काळात चाकण मधील संघटीत गुन्हेगारी करणार्या टोळ्यांमधील सुमारे बारा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाया करण्यात आल्या होत्या. आता तडीपारीच्या कारवायांमधून सराईत गुन्हेगारांना टप्प्यात घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
मोक्क्याला मंजुरी
दरम्यान तडीपारीच्या माध्यमातून गुन्हेगारांना जरब बसविण्याचे पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे व तिघांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. त्याचप्रमाणे काहींचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. सिगारेटच्या ट्रक लुटल्याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या एका टोळीवर मोक्काखाली करवाई करण्यात येणार असून संबंधित मोक्क्याच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारी (दि.24) मंजुरी दिली असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.
तडीपारीच्या प्रस्तावांची आकडेवारी :
मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम 55 प्रमाणे अवैध धंदे चालक, रेकॉर्डवरील गुन्हेगार आदींवरील 30 कारवाया प्रस्तावित असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यातील 3 तडीपारीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम 57 प्रमाणे न्यायालयाकडून शिक्षा झालेले मात्र सध्या जामिनावर असलेल्या सहा जणांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम 56 प्रमाणे तीन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल झालेल्या 7 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यातील चार प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत.