धुळे । राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद धुळे अंतर्गत जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवास सोमवारी 22 रोजी सुरवात झाली. तीन दिवसीय या ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्यमिक) येथे महापौर कल्पना महाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही दिंंडी डॉ.आंबेडकर पुतळा, शहीद स्मारक, जिल्हा परिषद, जिजामाता हायस्कूल,झाशीची राणी पुतळामार्गे कमलाबाई कन्या शाळेत पोहचली. यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या होत्या.
500 विद्यार्थी सहभागी
ग्रंथदिंडीत शहरातील 19 शाळांमधील 500 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या ग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. यानंतर जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे उदघाटन पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले, ज्येष्ठ साहित्तिका सुलभा भानगावकर, स्त्री शिक्षण संस्थेच्या सचिव अनुराधा गरूड यांच्याहस्ते झाले. यावेळी बोलतांना सुभाष अहिरे म्हणाले की, समाजात ग्रंथ संस्कृती रूजविणे महतवचे आहे. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन, ग्रंथाची निर्मिती झाली पाहिजे. तर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे म्हणाले, मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. याप्रसंगी कमलाबाई कन्या शाळेच्या आवारात भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे मान्यवरांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. दरम्यान दुपारच्या सत्रात बालकवींचे संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.