तीन मिनिटात गुंडाळली भुसावळ पालिकेची सभा

0

भुसावळ झाले हगणदरीमुक्त शहर ; रस्ता काँक्रिटीकरणासह विकासात्मक कामे होणार

भुसावळ- पालिकेची शनिवारी आयोजित सर्वसाधारण सभा अवघ्या तीन मिनिटात गुंडाळण्यात आली. अजेंड्यावरील 12 विषयांना सत्ताधार्‍यांनी एकमुखी मंजुरी दिली. दरवेळी सभागृहात पोलिसांचा असलेला फौजफाटा व नागरी विषयांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये होणार्‍या हमरी-तुमरीमुळे पालिकेची सभा जिल्हाभरात चर्चेची ठरत होती मात्र शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विपरीत घडले. सभेच्या अजेंड्यावर असलेल्या 12 विषयांना सत्ताधारी नगरसेवकांनी एकमुखाने मंजुरी दिली. चांगले काम करणार्‍या नगरसेवकांचा नगराध्यक्षांनी गौरव केला.

या विषयांना मिळाली मंजुरी
सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी गराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 12 विषयांना मंजुरी मिळाली. त्यात- मागील सभांचे इतिवृत्त कायम करणे, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना लाभ देणे, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत भुसावळ शहराला तीन तारांकित मानांकन दर्जाचे शहर घोषित करणे, प्रभाग क्रमांक दोनमध्ये संरक्षक भिंत बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे, आरपीडी रोडवर प्रवेशद्वारे बांधणे, प्रभाग पाचमध्ये काँक्रिटीकरण, अशोक रोडवेज ते सुधीर चौधरी यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे, प्रभाग पाचमध्ये दस्तगीर यांच्या घरापासून अक्का खाटीक यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार, याच प्रभागात नामदेव कुंभार यांच्या घरापासून शफी खाटीक यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार करणे.

जनआधारची ताकद झाली क्षीण !
भुसावळ पालिकेतील विरोधी गट असलेल्या जनआधार विकास पार्टीच्या गटनेत्यासह चौघा नगरसेवकांना तत्कालीन मुख्याधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी अपात्र करण्यात आल्यानंतर जनआधारची ताकद काहीशी क्षीण झाल्याचा प्रत्यय शनिवारच्या सभेत आला. शहरातील पाणीप्रश्‍नासह रस्त्यांची दुरवस्था व अन्य नागरी विषयांवर जनआधारच्या नगरसेवकांनी सभागृहात बोलणे टाळले मात्र सभा संपल्यानंतर औपचारीकरीत्या नगराध्यक्षांकडे तक्रारी करण्यात आल्या. पालिकेतील प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या जनआधारच्या नगरसेवकांना अपात्र करण्यात आल्याने अवघ्या तीन नगरसेवकांनी सभेला हजेरी लावली तर सभा संपल्यानंतर दोन नगरसेविका आल्या.

विकासात्मक विषयाला प्राधान्य -नगराध्यक्ष
शनिवारच्या सभेत शहर विकासाच्या विषयांना प्राधान्य देण्यात आल्याने खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा आटोपली. शहरातील सर्व प्रश्‍न सोडवले जात असून लवकरच पाणीप्रश्‍नदेखील निकाली काढला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. पालिकेच्या सभागृहात शांततामय मार्गाने प्रश्‍न मांडल्यास समस्या निश्‍चित सुटतील, असेही ते म्हणाले.

लग्नमुहूर्तासाठी नगरसेवकांना झाली घाई
शनिवारी पालिकेची सभा 11 वाजता सुरू होवून विषय वाचनाला सुरुवात झाल्यानंतर सत्ताधार्‍यांनी विकासात्मक विषय असल्याचे सांगत सर्व विषयांना मंजुरी दिली. काही नगरसेवकांना लग्नाला जाण्यासाठी घाई झाल्याने त्यांनी तातडीने सभा उरकल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली.