तीन मुलांना विहिरीत ढकलून आईची आत्महत्या

0

जळगाव । तालुक्यातील तामसवाडी येथे एका 33 वर्षीय महिलेने घरगुती भांडणावरून संतापाच्या भरात दोन मुली व एक मुलाला सोबत घेत गावाजळील विहिरीत उडी घेवून आत्महत्त्या केल्याची हृदयद्राव घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सुभाष विनायक कोळी रा. वलवाडी ता.भडगाव हा पनी व मुलामुलीसोबत सासरी तामसवाडी येथे एक दिड वर्षापासून रहायला आले होते. त्यात सुभाष कोळी यास काही कामधंदा येत नाही म्हणून सरलाबाई (पत्नी) यांच्यात घरगुती किरकोळ वाद व्हायचे. आज सकाळीही त्यांच्यात वाद झाल्याने दुपारी 2 वा. सरलाबाई सुभाष कोळी (वय 33) व तिची दोन नंबरची मुलगी प्रियंका (5 वर्ष), पायल (3), मुलगा कृष्णा (दिडवर्ष) यांना घेवून तामसवाडी शिवारातील वसंत अर्जुन पाटील यांच्या शेताकडील विहिरीकडे जातांना सरलाबाईच्या बहिणीचा मुलगा योगेश कोळी याने पाहिले. त्यानंतर त्याने त्याचा मामा भागवत कोळी यास सदर बाब सांगितली. त्यानंतर भागवत व गावातील लोकांनी विहिरीकडे जावून पाहिले असता विहरीच्या कठड्याजवळ सरलाबाईच्या चपला पडलेल्या होत्या. गावातील पोहणार्‍या तरूणांनी विहिरीत उतरून पाहिले तर चारही मृतदेह पाण्यात आढळून आले.

त्यांना बाहेर काढून तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेवून तेथे डॉ.योगेंद्र पवार यांनी तपासून चारही जण मयत झाल्याचे सांगितले. तद्नंतर मृतदेह पारोळा कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉ.प्रशांत रनाडे, डॉ.सुनिल पारोचे, दिपक सोनार यांनी शव तपासणी केली. कुटीर रूग्णालयात व तामसवाडी गावात ही घटना घडल्यानंतर एकच आक्रोश, शोककळा पसरली होती.

मोठी मुलगी काजल बचावली

सरलाबाईने कृष्णाला कडेवर घेवून दोघे मुली प्रियंका, पायल यांना बोट धरून नेले मात्र चवथी मुलगी काजलला नेता येत नसल्याने तिला घरीच सोडून गेल्याने काजलचा जीव वाचला. पती सुभाष विनायक कोळी यास हे.कॉ.भगवान साळुंखे व पंढरीनाथ पवार यांनी घटना समजताच ताब्यात घेवून अटक केली. या घटनेची खबर मयत सरलाबाई यांचा लहानभाऊ भागवत दत्तू कोळी याने पारोळा पो.स्टे.ला. दिल्यावरून पारोळा पो.स्टे.ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास प्रकाश चौधरी, भगवान साळुंखे, पंढरीनाथ पवार हे करीत आहेत.