नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे सातवे पंतप्रधान आहेत. देशात आतापर्यंत 14 पंतप्रधान झाले, त्यातील सात पंतप्रधान असे आहेत, ज्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. मात्र उर्वरित सात पंतप्रधानांच्या नशिबी हे भाग्य नव्हते. यातील पाच पंतप्रधान तर असे आहेत, ज्यांना वर्षभराचाही कालावधी मिळाला नाही. ज्यांनी पंतप्रधानपदाचा पाच वर्षे वा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केला, यात पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग यांचा समावेश आहे. वाजपेयींनंतर मोदी हे दुसरे यशस्वी काँग्रेसतर पंतप्रधान ठरले आहेत.
नेहरुंनंतर इंदिराजींना सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा सन्मान
देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा बहुमान पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावावर आहे. नेहरु हे तब्बल 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधान होते. पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. सर्वात कमी काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम गुलझारीलाल नंदा यांच्याकडे आहे. गुलझारीलाल नंदा दोन वेळा प्रत्येकी 13 दिवसांसाठी कार्यवाहक पंतप्रधान होते. नेहरुंच्या खालोखाल इंदिरा गांधी 15 वर्षे 350 दिवस म्हणजे जवळपास 16 वर्षे पंतप्रधान होत्या. राजीव गांधी 5 वर्षे 32 दिवस पंतप्रधानपदावर होते. पी. व्ही. नरसिंहराव यांनी 4 वर्षे 330 दिवस पंतप्रधानपद भूषवले. अटलबिहारी वाजपेयी तीन टप्प्यात 6 वर्षे 64 दिवस पंतप्रधानपदावर होते. डॉ. मनमोहन सिंग सलग 10 वर्षे पंतप्रधानपदावर होते. गांधी घराण्याच्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीने एवढा दीर्घकाळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम मनमोहन सिंग यांच्या नावावर आहे. हे सहा भाग्यवान पंतप्रधान सोडले तर अन्य सात नेत्यांना पंतप्रधानपदाचा तीन वर्षोचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. यात लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंह, विश्वनाथप्रतापसिंह, चंद्रशेखर, एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचा समावेश आहे. यात मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक म्हणजे 2 वर्षे 126 दिवस पंतप्रधानपद भूषवले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांचा क्रमांक लागतो. 1 वर्ष 216 दिवस शास्त्रीजी पंतप्रधान होते.
नेहरूंइतकी लोकप्रियता लाभली नरेंद्र मोदींना!
विश्वनाथप्रतापसिंह, देवेगौडा, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, आणि चौधरी चरणसिंह यांना पंतप्रधानपदाचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. विश्वनाथप्रतापसिंह 343 दिवस, इंद्रकुमार गुजराल 332 दिवस, एच. डी. देवेगौडा 324 दिवस, चंद्रशेखर 223 दिवस, आणि चौधरी चरणसिंह 170 दिवस पंतप्रधान होते. त्यामुळे पंतप्रधानपदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे नरेंद्र मोदी हे सातवे पंतप्रधान आहेत. म्हणजे देशाच्या 14 पंतप्रधानापैकी आतापर्यंत फक्त सात जणांनाच तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यामुळे याचे राजकीय महत्त्व लक्षात यावे. विशेष बाब म्हणजे, देशाचे अत्याधिक लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर त्या खालोखाल लोकप्रियता नरेंद्र मोदी यांना मिळाली आहे. नेहरू यांच्याप्रमाणेच मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशवासीयांनी विविध राज्यांच्या सत्ता त्यांच्याकडे सोपविल्या आहेत.