तीर्थंकरांच्या प्रतिमांचे मिरवणुकीतून दर्शन

0

भुसावळ शहर व विभागात महावीर जयंतीचा जल्लोष ; ‘अहिंसा परमो धर्म’चा जागर ; भव्य मिरवणुकीत शेकडो समाज बांधवांचा सहभाग

भुसावळ- भुसावळ शहरासह विभागात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भुसावळ शहरात ‘जन्म कल्याणक उत्सव समिती’ने काढलेल्या मिरवणुकीत सजवलेल्या 24 वाहनांवर 24 तीर्थंकरांच्या ठेवलेल्या प्रतिमांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. बुधवारी सकाळी 9 वाजता गांधी चौकातून सुरूवात झालेल्या मिरवणुकीची संतोषीमाता हॉलजवळ सांगता झाली. श्वेतांबर जैन समाज, तेरापंथ जैन समाज, दिगंबर जैन समाज, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी मिरवणुकीत ढोल वाजवून समाजबांधवांचा उत्साह वाढवला.

यांचा होता मिरवणुकीत सहभाग
जन्म कल्याणक उत्सव समितीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेतले. त्यात शहरातून निघालेल्या मिरवणुकीत लहान मुला-मुलींचे ढोल पथक, एकाच रंगाचे जॅकेट परिधान करून सहभागी झालेले भगवान महावीर नवयुवक ग्रुपचे सदस्य लक्षवेधी ठरले. आमदार संजय सावकारे, संघपती सुगनचंद सुराणा, नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, रवींद्र निमाणी, जे.बी.कोटेचा, अशोक वासकर, सचिन डेलीवाला, संजय चोरडीया, महेंद्र कोठारी, रमेश अन्नदाते, भुषण चोरडीया, संन्मुख चोरडीया, अनिल जैन, शिरीष नहाटा, संदीप देवडा, राजेश बाफना यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले. दीपाली साखरे, मंगला कोटेचा यांनी सूत्रसंचालन केले. सुशील बहुमंडळ, संगीत बहुमंडळ, तेरापंथ सभा, महावीर नवयुवक मंडळ, जीन वाणी साहित्य मंडळ, जैन महिला मंडळ, जीनयक्षिनी सुनबाई मंडळ, महिला महासमिती, शांतीसागर पाठशाळा, समता बहु मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.

समाजप्रबोधनाचा संदेश
सायंकाळी सात वाजेला संतोषीमाता हॉलमध्ये भगवान महावीर पाळणा व नृत्य नाटिकेतून समाज प्रबोधन करण्यात आले. त्यात जैन सकल समाजातील बालगोपाळांनी सहभाग घेतला. महिला मंडळांनी भजन व भक्ती गीतांतून ’अहिंसा परमो धर्म’ असा संदेश दिला.

सावद्यात मुनिश्री विशेषसागर महाराजांचा शोभायात्रेत सहभाग
सावदा-
भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील स्वामिनारायण नगरातील जैन मंदिरात पहाटे सहा वाजता अभिषेक, पूजन झाले. यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. साळी बाग, चांदणी चौक, संभाजी चौक मार्गाने पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटीलपुरा, इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकातील नवीन जैन मंदिराजवळ या शोभायात्रेची सांगता झाली. श्रमणमुनी विशेषसागर महाराज व जैन धर्मीय महिला-पुरुषांनी त्यात सहभाग घेतला. शहरातील 110 वर्ष जुने जैन मंदिर पाडून तेथे आता भव्य तीन मजली मंदिराची उभारणी केली आहे. या नवीन मंदिर स्थळी 20 एप्रिलपासून पंचकल्याणक महोत्सवात सुरू होणार आहे, असे मुनिश्री विशेषसागर महाराजांनी सांगितले. सायंकाळी मोटारसायकल रॅली, भजनसंध्या कार्यक्रम झाला.