ती येतेय!

0

दिल्लीतील इंडिया गेटवर मध्यरात्री प्रियांका गांधी वड्रा एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाली. काँग्रेसच्या कँडल मार्चमध्ये अध्यक्ष राहुल गांधी सहभागी होणार आहेत हे माहीत होते. पण, प्रियांका गांधी ह्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत याची कल्पना पक्षातल्या वरिष्ठ आणि ज्येेष्ठ नेत्यांनाही नव्हती. त्यामुळे प्रियांका गांधी इंडिया गेटवर आल्याचे पाहताच या नेत्यांपासून प्रसिद्धी माध्यमांनाही धक्का बसला होता. त्या ऐन मध्यरात्री त्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहेच, पण भाजपमध्ये त्याहून जास्त चर्चा रंगली आहे.

प्रियांका गांधी इंडिया गेटवरून परतल्यावर प्रसिद्धी माध्यमांनी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याकडे प्रियांका गांधी का आल्या होत्या याची विचारणा केली. त्यावेळी त्या काँग्रेस नेत्याने दिलेले उत्तर फारच मजेशीर होते. या नेत्याने हसत हसत उत्तर दिले, मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च करण्याची आयडिया ही काँग्रेसच्या परंपरागत विचारसरणीपेक्षा एकदम वेगळी आहे. ही कल्पना प्रियांका गांधींचीच असावी, असे मला वाटते. एका वरिष्ठ नेत्याने असे उत्तर दिल्यावर तुम्हा काय म्हणाल?

कठुआ आणि उन्नावमधील दुर्दैवी घटनेनंतर ज्या पद्धतीने समाज माध्यमापासून विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये भाजप, उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील महेबुबा मुफ्ती सरकारवर जो टीकेचा आसूड उमटला तो पाहून काँग्रेसने एकाएकी आक्रमक होण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवर बॉलिवूड आणि देशातील चित्रपटसृष्टींमधील मोठ्या मोठ्या कलाकारांनी या भयावह घटनेवर आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केल्यावर काँग्रेसच्या कोअर टीमला एक संदेश मिळाला, मध्यरात्रीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष कँडल मार्च काढणार आगे. सुरुवातीला एक दिवस थांबून या कँडल मार्चची तयारी करण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू होता. पण पक्षातील आघाडीच्या फळीतील नेत्यांना वेळेचे महत्त्व लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना तातडीने 24 अकबर रोड येथे पोहोचण्याचे आदेश देण्यात आले.

प्रियांका गांधी यांच्या कार्यालयात काम करणार्‍या एका व्यक्तीने सांगितले की, प्रियांका मॅडम रात्री आठ वाजल्यानंतर अ‍ॅक्टिव्ह झाल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक बड्या नेत्याला फोन गेले. त्यावेळी प्रियांका गांधीही कँडल मार्चमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती या नेत्यांना देण्यात आली नव्हती. पण प्रियांका मार्चमध्ये जाणार असल्याची माहिती सुरुवातीला केवळ राहुल गांधी, स्वत: प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यानांच माहीत होते. इंडिया गेटवर प्रियांका ज्यापद्धतीने प्रसिध्दी माध्यंमापासून काँग्रेस कार्यकर्त्यांवर बरसली, त्याचे कौतुक अनेकांकडून ऐकायला मिळते. कँडल मार्चच्या दरम्यान, राहुल गांधी गाडीच्या टपावर प्रसिद्धी माध्यमांशी सवांद साधत होते, पण प्रियांका गांधी जमिनीवरच बसून होत्या. त्यावर काँग्रेसची एक महिला नेता म्हणाली की, प्रियांकाचा असा अंदाज याआधी कधी पाहिला नव्हता. ती आरामात रस्त्यावर बसलेली होती, मार्चमध्ये सहभागी झालेल्या महिलांशी बोलत होती. तिच्या डोळ्यातील राग स्पष्टपणे दिसत होता. कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे ती सांगत होती. विशेष म्हणजे आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी त्यांना टीप्सही देत होती. आतापर्यंत प्रियांका बहुतेकवेळा पडद्याच्या मागे राहून सूत्र हलवायची. पण कॅमेर्‍यापासून लांब न पळता, आक्रमक पद्धतीने काँग्रेसच्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होण्याची प्रियांकाची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे प्रियांका आता हळूहळू सक्रिय होते आहे, अशी चर्चा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ऐकू येऊ लागली आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलता बोलता उल्लेखही केला, सोनिया गांधींनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे आपल्या दोन्ही मुलांना सांगितले आहे. त्यामुळे प्रियांका गांधींना पुढे आणण्याबाबत गांधी परिवारात चर्चा आहे.

पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. सध्याच्या लोकसभेत राहुल गांधी अमेठीतून, रायबरेलीतून सोनिया गांधी आणि सुलतानपूरमधून वरुण गांधी प्रतिनिधित्व करत आहेत. वरुण भाजपवर नाराज आहे हे जगजाहीर आहे. वरुण आणि प्रियांका यांचे नियमितपणे संभाषण होत असते. केवळ काँग्रेस बीट असलेल्या एका पत्रकाराच्या निरीक्षणानुसार केंद्रीय मंत्री आणि वरुणच्या आई मेनका गांधी, आपल्या मुलाने काँग्रेसमध्ये जावे याच्या पूर्णपणे विरोधात आहेत. पण ज्यापद्धतीने वरुण आणि भाजपमध्ये नातेसंबंध निर्माण झाले आहेत ते पाहिल्यावर स्वत: मेनका वरुणला किती काळ रोखू शकतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून, प्रियांका गांधी रायबरेलीतून आणि वरुण गांधी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असल्याचे पाहायला मिळाले, तर आश्‍चर्य वाटायला नको. अमेठी, रायबरेली आणि सुलतानपूरमधून गांधी परिवारातील सदस्य निवडणूक लढू शकतात.दुसरीकडे प्रियांकाचे पती रॉबर्ट वड्रा यांनाही सक्रिय राजकारणात उतरायचे आहे. त्यामुळे गांधी परिवाराने निर्णय घेतल्यास ते मुरादाबादमधील काँग्रेसचे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

प्रियांकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची मागणी अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अनेक बडे नेते 10 जनपथ येथे करत आले आहेत. काँग्रेसच्या वरच्या फळीतील नेत्यांच्या मताप्रमाणे स्वत: सोनिया गांधी प्रियांकाने निवडणूक लढवण्याविरोधात आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून भारतीय राजकारणात मोठी ढवळाढवळ सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रियांकाची खरी गरज पक्षापेक्षा आपल्यालाच जास्त आहे याची जाणीव बहुतेक राहुल गांधींना झाली असावी. प्रियांकाच्या एका निकटवर्तीयानुसार, प्रियांकाला आपली भूमिका इंडिया गेटवरील आंदोलनाप्रमाणे मर्यादित ठेवायची आहे. प्रियांका देशातील महिलांच्या समस्येला हात घालेल जेणेकरून देशातील महिला व्होट बँकेशी थेट संपर्क राहील. अशा पद्धतीने काम केल्यास राहुल आणि प्रियांका एकमेकांचे प्रतिस्पर्धी ठरण्याऐवजी ते एकमेकांना पूरक ठरतील. लोकसभेच्या पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टक्कर देण्यासाठी केवळ राहुल गांधींना एकट्याने मैदानात सोडता येणार नाही याबाबतच निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असावा. या लढाईत राहुल गांधींसाठी एक विश्‍वासू आणि योग्य सहकारी प्रियांका गांधीच असू शकते.

– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117