स्थायी समिती बैठकीत सदस्यांची भूमिका
पिंपरी-चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलचे) कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे कर्मचार्यांना विनाकारण त्रास देत आहेत. पीएमपीएममध्ये कर्मचार्यांची पिळवणूक केली जाते. कर्मचार्यांना विनाकारण कामावरुन बडतर्फ करतात. यावरुन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत चर्चा झाली. स्थायी समितीने आक्रमक होत तुकाराम मुंढे यांना राज्यसेवेत पाठविण्यात, यावी अशी भूमिका सदस्यांनी घेतली. मुंढे यांनी अचानकपणे कंत्राटी कर्मचार्यांना कामावरून काढण्याचा धडाका लावला आहे. त्यांच्या कारवाईबाबत कर्मचार्यांनी बुधवारी महापालिकेत पदाधिकारी व अधिकार्यांकडे दाद मागितली. त्यामुळे अधिकार्यांना स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह सर्वच सदस्यांनी पीएमपीच्या अधिकार्यांना फैलावर घेतले. अधिकारी अजय चाठणकर, योगेश होले, सुभाष गायकवाड यांना जाब विचारला.
पीएमपीएलचे अधिकार्यांवर काढला राग
मुंढे यांनी आपल्या कार्यशैलीनुसार मागील काही दिवसांपासून अनेक कायम कर्मचार्यांवर धडक कारवाई केली आहे. तर, कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे. काही चालक-वाहक कर्मचारी दररोज हजर राहूनही त्यांना बसवर पाठविले जात नाही. तासन्तास ताटकळत ठेवले जाते. या सगळ्यावरून शहरातील कर्मचार्यांनी पालिका पदाधिकार्यांकडे तक्रारी केल्या आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत कर्मचार्यांवरून जोरदार चर्चा झाली. पीएमपीचे अधिकारी अजय चाठणकर, योगेश होले, सुभाष गायकवाड यांना स्थायी समितीच्या सदस्यांनी जाब विचारला.
बैठक संपेपर्यंत कर्मचार्यांचा ठिय्या
कामावरून काढलेले कर्मचारी बैठक होईपर्यंत स्थायी समिती सभागृहासमोर होते. बैठकीनंतर त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व पदाधिकार्यांना विनंती केली. कर्मचार्यांच्या समस्येवरून महापौर नितीन काळजे यांनी पीएमपीएमएल संचालक मंडळाची बैठक बोलविण्यासाठीचे पत्र तुकाराम मुंढे यांना पाठविले आहे. बैठकीत कर्मचार्यांचे प्रश्न समजून घेत त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.