तुम्हाला सुनावणी रोखण्याचा अधिकार नाही!

0

कठुआ बलात्कार : सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना फटकारले

नवी दिल्ली : तुमच्याजवळ प्रॅक्टिसचा अधिकार आहे, सुनावणी रोखण्याचा नाही. अद्याप तुमचे आंदोलन संपले की नाही? निष्पक्ष सुनावणीत आम्हाला रस आहे, तुमच्या आंदोलनात नाही, अशा शब्दांत कठुआ सामूहिक बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या वकिलांना फटकारले. यानंतर 12 एप्रिललाच आंदोलन मागे घेतल्याचे या वकिलांनी न्यायालयास सांगितले. त्यानंतर 26 एप्रिलरोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने वकिलांना निरूत्तर केले!
जम्मू-काश्मीरचे वकिल सर्वोच्च न्यायालयाला हे सांगण्याचा प्रयत्न करीत होते की, माध्यमांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवले. आमचे आंदोलन इतर कारणांसाठी होते. मात्र, ते बलात्काराच्या प्रकरणाविरोधात असल्याचे दाखवले गेल्याचे या वकिलांनी म्हटले. यावर टिप्पणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले, आंदोलनाची पार्श्वभूमी काहीही असो मात्र, त्याचा परिणाम चुकीचा झाला. आम्हाला केवळ निष्पक्ष सुनावणीची चिंता आहे. जम्मू-काश्मीरच्या न्यायालयात वकिलांच्या आंदोलनामुळे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे पोलिसांना कठुआ बलात्कार प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायाधीशांच्या घरी जावे लागले होते, याची आठवण न्यायालयाने वकिलांना करुन दिली.

आरोपींसाठी वकिलांचे आंदोलन
कठुआमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात स्वतः सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले होते. दरम्यान, आरोपींवर आरोपपत्र दाखल करु नये यासाठी जम्मू-काश्मीरच्या वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. यावर कोणीही पीडित किंवा आरोपीचे वकिलपत्र घेण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी यासंदर्भात बार काऊंसिल ऑफ इंडिया आणि जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाला उत्तर देण्यास सांगितले होते.