जळगाव : ऑक्टोबर 2017 पासून आजपावेतो थकीत असलेला 6 महिन्यांचा पगार त्वरीत एकत्र अदा करण्यात यावा, 2017 या वर्षाचा दिवाळी बोनस कामगारांना मागणी करुन व 30 नोव्हेंबर 2017 पूर्वी मागणी निवेदन देऊन सुध्दा मिळालेला नाही तो त्वरीत अदा व्हावा, किमान वेतन कायदा, बोनस अधिनियम व कायदे गुंडाळून बासनात ठेवुन कामगारांची लुट करणार्या तुलसी व्यवस्थापनावर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी सोमवार, 9 रोजी तुलसी एक्स्ट्रुजन कंपनीतील कर्मचार्यांतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
…तर व्यवस्थापन जबाबदार
कामगारांच्या मागण्यांच्या निवेदनावर त्वरीत सकारात्मक निर्णय व्हावा व शेकडो कामगार कुटूंबिय यांना बेरोजगारी, उपासमारीच्या विळख्यातून सुटका करुन न्याय द्यावा. अन्यथा कामगारांमध्ये साचत असलेल्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही व तसा प्रसंग उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन व सरकारची असेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर कॉ. कैलास कोळी, दीपक भिरुड, अशोक गावंडे, राजेश नारखेडे, रावसाहेब धोबी, ज्ञानेश्वर पाटील, कैलास वाघ, ज्ञानेश्वर वानखेडे, प्रभाकर सोनवणे आदींच्या सह्या आहेत.