तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची देय रक्कम तातडीने देण्यात यावी

0
पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश
मुंबई : तूर  हरभरा  उत्पादक  शेतकऱ्यांची देय  असलेली  रक्कम तातडीने देण्यात यावी  असे स्पष्ट  निर्देश पणन  मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिले. दि  महाराष्ट्र स्टेट  को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या  लिमिटेडच्या बैठकीत ते बोलत  होते. यावेळी  मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.योगेश  म्हसे,  अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह सचिव सतीश सुपे, एमएसडब्लुचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुहास  दिवसे, नाफेडच्या श्रीमती भाव्या तसेच  इतर अधिकारी  उपस्थित  होते.
अख्खी तूर, ई ऑक्शन व्दारे विक्री व भरडाईसाठी निर्गमित तूर, शासनाच्या विविध  विभागाअंतर्गत तूरडाळ पुरवठा, हरभरा खरेद अनुदान,मूग, उडीद, सोयाबीन संदर्भात सद्यस्थिती याचा आढावा  पणन मंत्र्यांनी  घेतला. कोणत्याही परिस्थितीत  तातडीने शेतकऱ्यांच्या खरेदी  केलेल्या मालाचे  पैसे द्यावेत, पुढील काळात उपलब्ध गोडाऊनच्या जवळपास खरेदी केंद्र  सुरु करावीत,असे  निर्देश  त्यांनी यावेळी दिले.
तूरडाळ व हरभरा खरेदी सद्यस्थिती
राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करुन तूरडाळ शासनाच्या विविध योजने अंतर्गत पुरवठा करण्यात येत आहे. 5 ऑक्टोबर 2018 अखेर एकूण तूरसाठा25.25 लाख क्विंटल तसेच भरपाईसाठी दिलेली तूर8.77 लाख क्विंटल, ई ऑक्शनद्वारे विक्री केलेली तूर6.40 लाख क्विंटल, एकूण निर्गमित केलेली तूर15.17 लाख क्विंटल तर शिल्लक तूर 10.08 लाख क्विंटल आहे. शासनाच्या विविध विभागा अंतर्गत मागणी नुसार 5 लाख 51 हजार 117.49 क्विंटल तूरडाळ पुरवठा करण्यात आली.
राज्यामध्ये हरभरा खरेदी करण्याकरिता 3लाख 02 हजार 828 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 1 लाख 39 हजार 248 शेतकऱ्यांची खरेदी करण्यात आलेली आहे. तूर व हरभरा या पिकांचे सन2017-18 मधील शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे संपूर्ण चुकारे अदा केल्यानंतर खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे नियोजन केलेले आहे अशी माहिती डॉ.योगेश म्हसे यांनी या बैठकीत दिली.
हंगाम 2018-19 मध्ये मुग, उडीद व सोयाबीन संदर्भात नाफेडने 157 खरेदी केंद्र मंजुर केली आहेत. त्याठिकाणी मुगासाठी आधारभूत प्रती क्विंटल दर 6 हजार 975 रुपये असून चार लाख क्विंटल खरेदी राज्य शासनाने प्रस्तावीत केले आहे. उडीदासाठी 5 हजार 600 प्रती क्विंटल दर असून3.50 लाख क्विंटल खरेदी व सोयाबीनसाठी 3 हजार399 प्रती क्विंटल दर असून 25 लाख क्विंटल खरेदी प्रस्तावीत आहे. मुग व उडीद शेतकरी नोंदणीची मुदत24 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तसेच  राज्यात दिनांक 9 ऑक्टोबर अखेर 12 हजार 721उडीदासाठी, 8 हजार 914 मुगासाठी तर 7 हजार279 सोयाबीनसाठी शेतकऱ्यांची खरेदीकरिता नोंदणी झालेली आहे. अशीही माहिती बैठकीत देण्यात आली.