थिरूवनंतपुरम- शबरीमाला मंदिराचा वाद अद्याप संपलेला नाही. दरम्यान आज शबरीमला मंदिरात दर्शन घेणारच असा हट्ट घेऊन केरळमध्ये दाखल झालेल्या तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. अशात शबरीमला मंदिराच्या समर्थकांनी आंदोलकांनी तृप्ती देसाईंना परत फिरण्याचा इशारा दिला आहे. तृप्ती देसाईंनी परत फिरावे अन्यथा त्यांना आमच्या छातीवर पाय देऊन मंदिरात जावे लागेल असा इशाराच विमानतळाबाहेर ठाण मांडून बसलेल्या राहुल इश्वर यांनी दिला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या आज सकाळपासूनच कोची विमानतळावर ठिय्या देऊन बसल्या आहेत. शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याशिवाय आपण महाराष्ट्रात परतणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर शबरीमला मंदिरात मला पोहचता येऊ नये म्हणून स्थानिक टॅक्सीचालकांनाही धमकावण्यात आल्याचे तृप्ती देसाईंनी म्हटले आहे.
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश नाकारल्याने तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी मंदिर प्रवेशाचा आपला मानस बोलून दाखवला होता. त्यासाठी त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र आज त्या कोची विमानतळावर आल्या तेव्हा तिथेच त्यांना रोखण्यात आलं. आता यानंतर आंदोलक राहुल इश्वार यांनी त्यांना थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे आता तृप्ती देसाई काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.