कोल्हापूर । चंदगड तालुक्यातील तेऊरवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांवर बहिष्कार घातला आहे. ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाकडे शासनाने आजपर्यंत लक्ष दिले नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गावाच्या उत्तर ,दक्षिण भागात नद्या आहे.तरी सुध्दा ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर बनत असतो तरी सुध्दा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
गावात होतो 2 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा
तेऊरवाडी गावाला नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाहीत. या गावापासून उतरेकडे 5 कि.मी. अंतरावर घटप्रभा नदीचे पात्र आहे. तर दक्षिणेकडे 4 किलोमीटर अंतरावर ताम्रपर्णी नदीचे पात्र आहे. या दोन्ही नद्या बारमाही वाहत असतात. या ठिकाणाहून गावाला पाणीपुरवठा केल्यास तेऊरवाडी गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल, अशी ग्रामस्थांची भावना आहे.तर दुसरीकडे निट्टूर पाझर तलाव होण्यापूर्वी ग्रामस्थांना पाण्यासाठी गावातील 5 कूपनलिकेवर अवलंबून रहावे लागत होते. निट्टूर पाझर तलाव झाल्यानंतर तलावाच्या शेजारी जॅकवेल बांधण्यात आली. मात्र, सुरुवातीच्या काही वर्षांनंतर या तलावातील पाण्याचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे या ठिकाणी बांधलेल्या जॅकवेलमध्ये पाण्याचा साठा कमी प्रमाणात होत आहे. त्याचा फटका तेऊरवाडी गावाला बसत आहे. 2 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. जानेवारीनंतर तेऊरवाडी गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.अनेक वर्षांपासून सर्व लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही कुणीही गांभीर्याने दखल घेतली नाही. यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे हत्यार ग्रामस्थांनी उपसले आहे. या निर्णयानंतर तरी शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वळेल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहे.