‘तेजस’च्या शुभारंभाला अपशकून

0

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नाचा पहिला टप्पा म्हणून उद्यापासून मुंबई ते गोवा मार्गावर धावणार्‍या ‘तेजस’ एक्स्पे्रसकडे पाहिले जात आहे. उद्या सोमवारी या गाडीचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार होता. त्याच्या आदल्या दिवशी अर्थात रविवारी अज्ञातांनी या गाडीवर दगडफेक करून ‘तेजस’च्या शुभारंभात अपशकून निर्माण केला आहे.

सोमवारी तेजस एक्स्प्रेस हिरवा कंदील दाखवला जाणार आहे, त्यानंतर ही ट्रेन मुंबई ते गोवा धावणार आहे. या ट्रेनचे पावसाळा आणि पावसाळ्याव्यतिरिक्त दिवसांतील वेळापत्रक, प्रवाशांचे दरपत्रक सर्व काही निश्‍चित झाले आहे. आजवरच्या तुलनेत तेजसमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही ट्रेन सध्या सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. ही ट्रेन मुंबईतून धावणार असल्याने या गाडीला शनिवारी दिल्लीहून मुंबईला पाठवण्यात आले. मात्र, या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गाडीचे काच फोडण्यात आल्या आहेत. ही तोडफोड कुणी केली आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पहिल्या प्रवासाच्या आधीच अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या गाडीचे नुकसान करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

ताशी 200 कि.मी. वेगाने धावणार्‍या या रेल्वेगाडीमुळे भारतीय रेल्वे नवीन गती पकडणार आहे. अशा या रेल्वेबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. या गाडीसाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज करावी लागणार आहे. इतके तेजसला महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा एक्स्पेेसवर दगडफेक करून तिच्या काचा फोडून या गाडीच्या शुभारंभामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.

तेजस एक्स्प्रेस ही रेल्वेच्या इतिहासात स्वयंचलित दरवाजे आणि गँग वे अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली पहिली ट्रेन आहे. तसेच ऑटोमेटिक डोर क्लोझिंग आणि सर्वच डबे आतून जोडलेली ही भारतातील पहिली एक्सप्रेस ट्रेन आहे. ही गाडी मुंबई-गोवा मार्गावर धावणार असून विमानाप्रमाणे आसनांमागे एलईडी स्क्रीन, चहा-कॉफीचे व्हेंडिंग मशीन्स, सीसीटीव्ही सारख्या अत्याधुनिक व्यवस्था या ट्रेनमध्ये असणार आहेत. सीएसएमटी स्टेशनवरून सोमवारी सुरेश प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सीएसएमटी स्टेशनवरून प्रायोगिक तत्त्वावर (करमाळी) गोवासाठी ही ट्रेन 22 मे रोजी कोकणात रवाना केली जाणार आहे. तेजस एक नवीन प्रीमियर क्लास ट्रेन असून प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक आरामदायक करणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. तेजस एक्स्प्रेस सर्वात आधी मुंबई आणि गोव्यात धावेल. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनऊ आणि दिल्ली-चंदिगडमध्ये चालवण्यात येईल.