‘तेजस्विनी’ची संख्या वाढणार

0

महिनाभरात 27 बसेस दाखल होणार : पीएमपी प्रशासनाची माहिती

पुणे : खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसला चांगला प्रतिसाद मिळत असून सद्यस्थितीत महिलांसाठी शहरात 30 बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. यात शनिवारी आणखी 6 बसेसची भर पडली. येत्या महिनाभरात आणखी 27 बसेस ताफ्यात दाखल होणार असून यानंतर शहरात महिलांसाठीच्या बसेसची संख्या वाढणार आहे.

गतवर्षी महिलादिनाचे औचित्य साधत पीएमपीतर्फे खास महिलांसाठी ’तेजस्विनी’ बससेवा सुरू करण्यात आली. याला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या एकूण 9 मार्गांवर 30 बसेसमार्फत तेजस्विनीची सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज 200 पेक्षा जास्त फेर्‍या होत आहेत.

दामिनी पथकाची स्थापना

पीएमपी प्रशासनाने तेजस्विनीची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिल्याने फायदा होत आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागातून मागणी वाढत आहे. परंतु अल्प बसेसमुळे प्रशासनाला हे शक्य होत नव्हते. मात्र, आता बसेसची संख्या वाढली आहे. यामुळे महिलांकडून मागणी करण्यात आलेल्या मार्गावर या बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, महिलांसाठीच्या या बसेसमधील फुकट्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी खास दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाकडून बसेस तपासणीचे काम सुरू आहे.

महिला चालक विचाराधीन

सद्यस्थितीत 9 मार्गांवर तेजस्विनी बसेस सुरू आहेत. मात्र, आता बसेसची संख्या वाढणार असल्याने त्यासाठी मार्गही वाढवण्यात येणार आहेत. येत्या महिनाभरात बसेस उपलब्ध होतील त्याप्रमाणात आवश्यक ते मार्ग निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसेसमध्ये चालक म्हणून महिला कर्मचारी नेमण्याचा विचार पीएमपी प्रशासन करत आहे. नव्या बसेसमध्ये अ‍ॅटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन तंत्रज्ञान असल्याने बस चालवण्यासाठी सोपी आहे. परिणामी, महिला चालकांचा विचार पीएमपी करत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.