हैदराबाद – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नवे बदलण्याचा धडाका सुरु केला आहे. यावरून त्यांच्यावर टीका देखील होत आहे. दरम्यान आता हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत तेलुगू नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी योगींनी सभा घेतली. त्यावेळी, तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार असल्याचे सांगितले.
हैदराबादमधील दहशतवाद्यांशी असलेल्याचे बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यावेळी योगींनी एमआयएमसह काँग्रेस आणि टीआरएसवर आरोप केले.
देशात राजराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बेगम बझार या असुद्दुद्दीन ओवैसीच्या बालेकिल्ल्यातूनच योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणातील जनतेला संबोधित केले. योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर उत्तर प्रदेशमधील अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज केले. त्यानंतर, आणखी २५ शहरांच्या नाव बदलीचा प्रस्ताव भाजापाच्या विचारधीन असल्याचे समोर आले होते.
हैदराबादमधून दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यात येत आहे. येथील काही संघटनांचे दहशवाद्यांशी संबंध असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, असेही योगींनी आपल्या भाषणात म्हटले आहे. देशात कुठेही दहशतवादी घटना घडल्यास त्याचे धागेदोरे हैदराबादमध्ये सापडतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी गोशामहल मतदारसंघाचे भाजपा उमेदवार टी राजा यांनीही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार असल्याचे एका स्थानिक सभेत बोलताना म्हटले होते.