तेलंगणा : मुस्लीम आरक्षणावर भाजपचा हंगामा

0

हैदराबाद: मुस्लीम आरक्षणावरून तेलंगणा विधानसभेत रविवारी जोरदार हंगामा झाला. मुसलमान आणि अनुसूचित जनजातीसंबंधी आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, भाजप आमदारांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. भाजप आमदारांनी सभापतींच्या आसनासमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज चालवनेच कठीण होऊन बसल्याने सभापतींनी भाजपच्या 5 आमदारांना निलंबित केले. या कारवाईवर बोलताना निलंबित आमदार जी किशन रेड्डी यांनी सरकारचे हे मतपेटीचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, तेलंगणा भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून निषेधही केला. आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेलंगणा सरकारने मुसलमान समुदायातील आर्थिक मागास घटकांना आरक्षण देण्याची सीमा चार टक्क्यांनी वाढवून बारा टक्क्यांवर नेण्याचा निर्णय शनिवारी घेतला.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील आरक्षणावर आधारित प्रमाण हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार आहे. त्यामुळे तेलंगणा विधानसभेत हे विधेयक पारित करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. हे विधेयक घटनेच्या नवव्या अनुसूचित सहभागी केले जाईल. यापूर्वी तामीळनाडूतही आरक्षणाबाबत अशी भूमिका घेण्यात आली होती.