तेलंगाणामध्ये टीआरएस नेत्याची हत्या

0

अमरावती-तेलंगणामध्ये राजकीय हेवादाव्यातून तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) नेता नारायण रेड़्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. विकराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात ही घटना घडली. आज सकाळी नारायण रेड्डी यांचा मृतदेह सापडला. रेड्डी यांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. दोन्ही कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी रेड्डी गट आणि त्यांच्या प्रतिस्पर्धकाच्या गटामध्ये वाद झाला होता. त्यानंतर उसळलेल्या संघर्षात टीआरएसच्या नेत्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे.