नाशिक : देशात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज या प्रकरणी निकाल दिला. तेलगी स्टॅप घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा आधीच मृत्यू झाला आहे.
३२ हजार कोटींपेक्षा जास्त असलेल्या या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. २००३ पासून या घोटाळ्याची सुनावणी सुरू होती. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल सुनावला. पुराव्याअभावी सर्वच्या सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.
स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी होता. अब्दुल करीम आणि त्याच्या भावांनी नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक व्यवसाय सुरू केला होता. हा घोटाळा उघड झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.