पुणे । देशभक्ती, जोश, प्रेरणा, विचार, ऐकण्याची वृत्ती असे अनेक गुण भगव्या रंगात आहेत. भारतातील राजकीय समाजाला कॅन्सर झाला आहे. गेल्या 3 दशकांमध्ये मतपेटीच्या राजकारणासाठी समाजाचे लांगुलचालन केले जाणे हे दु:खद आहे. सन 1942 पासून भारतीय टोपीचा रंग भगवा असता, तर आजचा भारत खूपच वेगळा दिसला असता. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तरुणाईला राजकारणाकडे पाहण्याकरीता आणि जाती-धर्म व्यवस्थेच्या सद्य:परिस्थितीबद्दल सतर्क केले.
समस्त हिंदू आघाडीतर्फे बाजीराव रस्त्याजवळील नातूबाग मैदान येथे अफझलखान वधाचा आनंदोत्सव म्हणजेच शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. यावेळी (नि.) ब्रिगेडियर डॉ. एस. के. अंबिके, अशोक मोडक, (नि.) मेजर रमेश उपाध्याय, मिलिंद एकबोटे, ओमसिंग भाटी आदी उपस्थित होते. हिंदवी स्वराज्यभूषण वीर जीवा महाले पुरस्कार कोल्हापूर येथील बजरंग दलाचे संयोजक संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांना प्रदान करण्यात आला. तर, हिंदुत्व शौर्य पुरस्कार मालेगावचे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना देण्यात आला. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रत्येक दहशतवादी हा मुस्लीम
विक्रम गोखले म्हणाले, प्रत्येक मुस्लीम हा दशहतवादी नसतो. परंतु प्रत्येक दहशतवादी हा मुस्लीम असतो, हे गेल्या तीन दशकांच्या इतिहासामध्ये घडलेले सत्य आहे. राजकारण्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे बहुसंख्याक दुखावले जात आहेत, याचे भान त्यांना नाही हे दुर्दैव आहे. हिंदू हा केवळ धर्म नसून ती जीवनसंस्कृती आहे. त्यामुळे देशाला चांगले दिवस पहायचे असतील, तर प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र वाचायला हवे. ते म्हणाले, महाराष्ट्रात ब्राह्मण-मराठा, मराठा-दलित तेढ वाढविणे, ब्राह्मणांना शिव्या घालणे, हे व्यसन झाले आहे. शिवछत्रपती हे मराठा समाजाप्रमाणे ब्राह्मण वर्गालाही देवासमान आहेत, ही वस्तुस्थिती विसरून नवा इतिहास सांगितला जात आहे. त्यामुळे आपल्याला सध्याच्या राजकारणाचे भान असायला हवे.
संस्कृतीहीन परिस्थितीला संपवायचे…
मोडक म्हणाले, हिंदू रक्त कोणालाही द्वेष करायला शिकवत नाही. मात्र, जो कोणी भारतमातेशी वैर करीत असेल, त्याला धडा शिकवायला हवा. जेएनयुमध्ये संसदेवर हल्ला करणार्या अफजलचे समर्थन केले गेले. हा भारताला लागलेला काळीमा असून संस्कृतीहीन बनत चाललेल्या या परिस्थितीला संपवायचे असेल, तर शिवरायांचे अनुकरण करायला हवे. शांताराम पिंगळे, प्रतिक मोहिते, लोकेश कोंढरे, अनिरुद्ध बनसोड, राजेंद्र बेंद्रे, सौरभ कर्डे, विशाल पवार, शिवशंकर स्वामी, संतोष गायकवाड, अरविंद वारुळे, विश्वास कळमकर आदींनी संयोजन केले. डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.
कबरीबद्दल सरकारला जाब विचारा
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कबरीबद्दल अजूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्याबाबत सध्याच्या सरकारला आपण जाब विचारायला हवा. तुम्ही कोणाच्या बाजूचे आहात, छत्रपती शिवाजी महाराज की अफजलखान? असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले, ज्यांना अफजलखानाचा पुळका असेल त्यांनी देश सोडून चालते व्हावे.