मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’संदर्भात तुम्ही ऐकलं असेलच. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथील शेतकर्यांसोबत अशाच प्रकारची ‘चाय पे चर्चा’ केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी शेतकर्यांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्ती न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता यवतमाळमधील शेतकरी मोदींविरोधात आंदोलन करणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चे’त नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्ती झालेली नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी 18 मे रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर 150 शेतकरी दाखल होणार आहेत. 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हे शेतकरी 24 तासांचं आत्मक्लेश उपोषण करणार आहेत.
महाराष्ट्रात यवतमाळमध्ये शेतकर्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. त्यामुळे आपल्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी हे गावं मोदींनी निवडलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 20 मार्च 2014 रोजी मोदींनी दाभडी गावात चाय पे चर्चाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमादरम्यान, शेतकर्यांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल इतका एमएसपी देऊ, इथल्या कापूस उत्पादक शेतकर्यांना मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी जिथे कापूस निघतो, तिथेच बाजारपेठ उभारू, अशी बरीच आश्वासने देण्यात आली होती. मात्र, ही आश्वासने पूर्ण न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन करून हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघणार आहेत. 18 मे रोजी काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात दिल्लीतील जंतरमंतरवर हे आंदोलन होणार आहे.