विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया पत्रकारांसमोर रडले. म्हणाले, माझा एन्काउंटर करण्याचा मोदी सरकारचा कट आहे. तोगडिया यांच्यासारख्या नेत्यावर अशी रडण्याची वेळ आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. सोशल मीडियासह सर्वत्र याच विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. फायरब्रॅन्ड हिंदुत्ववादी नेता असा घळाघळा रडल्याने अनेक शंकाकुशंका व्यक्त होत आहेत. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेही खासगीत आपला राग व्यक्त करत आहेत. तोगडियांचा एन्काउंटर करण्याचा मोदी सरकारने कट रचला असेल आणि तोही भारतीय गुप्तचर संस्थेला (आयबी) हाताशी धरून, तर हे प्रकरण खूपच गंभीर आहे. याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. आयबीचा वापर अशा अंतर्गत वादासाठी केला जात असेल, तर बाहेरच्यांसाठी विशेषत: विरोधी पक्षांसाठी ही यंत्रणा वापरली जात नसेल कशावरून? यासाठी सत्य जे काही असेल ते समोर यायला हवे.
विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया हे अतिशय आक्रमक, कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. मागील काही दिवसांपासून ते पडद्यामागे गेल्यासारखे भासत होते. तोगडिया हे सोमवारी सकाळी अचानक गुजरातमधील त्यांच्या कार्यालयातून गायब झाल्याच्या वृत्ताने विश्व हिंदू परिषद परिवारासह संपूर्ण देशभर विविध चर्चांना ऊत आला होता. विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी तर त्यांचे काही बरेवाईट झाले असावे, अशी भीतीही व्यक्त केली होती. त्यानंतर गुजरातमधील एका रुग्णालयात बेशुद्धावस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजले. त्यानंतर काही तासांतच सलाइन लावलेल्या अवस्थेत तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन जो गौप्यस्फोट केला, त्याने सारेच हादरून गेले होते. मला ठार मारण्याचा कट रचण्यात आला आहे, असा थेट आरोप तोगडिया यांनी मोदी सरकारसह राजस्थान व गुजरात सरकारवर केला आहे.
तोगडिया यांना ठार मारण्याचे षडयंत्र रचले जावे असे काय घडले? हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप यांच्याशी विश्व हिंदू परिषदेचे बिनसल्याचेच यातून स्पष्ट होते. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून तोगडिया आणि त्यांचे समर्थक अध्यक्ष राघव रेड्डी यांना पदावरून दूर करण्यासाठी संघाने यापूर्वी प्रयत्न केले आहेत. भुवनेश्वर येथे यासंबंधी झालेल्या या बैठकीत तोगडिया खूपच आक्रमक झाल्याने संघ आणि भाजपची त्यांच्यावरील नाराजी अधिकच वाढल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पेजवरून तोगडिया यांनी माझ्याविरुद्ध कुणीतरी कारस्थान रचत आहे, जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत, असे स्पष्ट म्हटले होते. याचा अर्थ अनेक दिवसांपासून हा अंतर्गत वाद खदखद होता. त्याचा एवढ्या लवकर आणि अशा पद्धतीने स्फोट होईल, असे खुद्द भाजप आणि संघाच्या नेत्यांनाही अपेक्षित नसावे. तोगडियांनी पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत संघर्ष उघड केला आहे. मात्र, अजूनही भाजप किंवा संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, हे प्रकरण यापुढे चिघळण्याची जास्त शक्यता आहे. तोगडियांना त्रास देण्याचा विचार गुजरात निवडणुकीनंतर अधिक बळावल्याचेही दिसून येते.
काही वर्षांपूर्वी तोगडिया आणि मोदी यांचे अतिशय चांगले संबंध होते. नंतर हे संबंध बिघडत गेेले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यातील मतभेद वाढतच गेले. आता हे मतभेद जीवघेण्या कटकारस्थानापर्यंत येऊन ठेपल्याचे तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपावरून दिसते.
गुजरातमध्ये मागील दोन निवडणुकांत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्याचा आरोप भाजपकडून केला जात असल्याची माहिती आहे तसेच पाटीदार समाजाचे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न तोगडिया यांनी केला, असे गुजरातमधील काही भाजपचे नेते खासगीत सांगत आहेत. यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी जागांवर समाधान मानावे लागल्याची खंत गुजरात भाजपमध्ये व्यक्त होत आहे.
राजकीय मुद्द्यांत लक्ष घालू नका, असे तोगडिया यांना भाजपकडून सांगण्यात आले होते, तरीही शेतकरी आत्महत्या, पाटीदार आंदोलन आणि निवडणुकांमध्ये तोगडिया यांनी दखल दिल्याचा भाजपचा संशय आहे. कारण भाजपने तंबी देऊनही तोगडिया यांनी निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये शेतकरी आणि युवकांचे मोर्चे काढले होते.
तोगडिया यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जीवालाच धोका निर्माण झाल्याने त्यांनी संघ परिवारासह भाजपलाच पत्रकार परिषद घेऊन आरोपीच्या पिंजर्यात सध्या उभे केले आहे. भाजप आणि संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आतापर्यंत संघ परिवारात तरी सर्व सुरळीत आहे, असा अनेकांचा समज होता. परंतु, तोगडिया यांच्या प्रकरणानंतर त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तोगडियांच्या आरोपांना काय उत्तर द्यायचे, हे अजूनही दोन्हीकडील नेत्यांना सुचलेले नाही.
भाजप आता अटलबिहारी वाजपेयींचा भाजप राहिला नाही. हे मात्र या प्रकरणातून स्पष्ट झाले. सध्याचे भाजपचे नेतृत्व कुणाकडूनही विरोध, टीका सहन करू शकत नाही, हे यापूर्वीही दिसलेच. मात्र, तोगडिया प्रकरणामुळे भाजपचे दुसरे रूप समोर आले आहे. तोगडिया प्रकरण संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेचे अंतर्गत प्रकरण असले, तरी तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन ते लोकांसमोर मांडले तसेच भारतीय गुप्तचर यंत्रणेचे नाव त्यांनी घेतल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढते. जुन्या केसेस उकरून काढल्या जात असल्याचे तोगडियांनी म्हटल्याने तेेथे पुन्हा न्यायालयाचा संबंध येत आहे.
तोगडिया प्रकरण हा आमचा अंतर्गत मामला आहे, असे कुणालाही म्हणण्यास आता जागा शिल्लक राहिलेली नाही. अंतर्गत वादातून कुणाचे एन्काउंटर करणे किंवा आयबीसारख्या यंत्रणेचा त्रास देण्यासाठी वापर करणे हा गुन्हा आहे. तोगडिया यांनी यासंबंधीचा गंभीर आरोप थेट मोदी सरकारवर केल्याने सरकारने यावर स्पष्टीकरण द्यायला हवे. अन्यथा, चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदे घेऊन केलेले आरोप, देशात सुरू असलेले ईडीचे धाडसत्र, घोटाळ्यांचे लागत असलेले निकाल, याचा संबंध सरकारशी जोडला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.