पुणे । महापालिकेच्या करसंकलन विभागात येऊन काम करणार्या तोतया कर्मचार्याचे प्रकरण प्रशासनाने गंभीर घेतले आहे. या बाबतीत संयुक्त समितीचा अहवाल मागवून दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त कुणालकुमार यांनी सर्वसाधारण सभेत दिले. या प्रकरणावर गुरुवारी संपन्न झालेली सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी सभासदांनी प्रशासनाच्या कामावर ताशेरे ओढले.
महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागात एक तोतया कर्मचारी काम करत असल्याचे प्रकरण बुधवारी उघड झाले. त्यावर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. सुराणा नावाचा एक माणूस गणेश लाड या महापालिकेच्या कर्मचार्याच्या टेबलवर बसून काम करतो, असे सांगितले. पूर्वी महापालिकेला बाहेरचे काम करून देण्यार्या कंत्राटदाराकडे ही व्यक्ती काम करत होती. आता या व्यक्तीला पालिकेत काम करण्याची परवानगी कशी द्यायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संबंधित व्यक्तीने केलेले काम नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ती व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये महापालिकेच्या कर्मचार्यांसोबत जेवताना दिसते असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद भैय्यासाहेब जाधव यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास उशीर का केला जातो, याबाबतचा खुलासा मागितला. उशिरा एफआयआर दाखल करून दोषी व्यक्तीला सुटण्याची संधी दिली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी विभागप्रमुख मापारी यांना कर्मचारी ओळखता येत नाहीत, असे निदर्शनास आल्याचे सांगितले. या माणसामुळे किती रुपयांचे नुकसान झाले याचीही माहिती घेण्यास त्यांनी सांगितले.
संयुक्तिक पथक स्थापणार
या प्रकरणी आयुक्त कुणालकुमार यांनी खुलासा करताना आय टी विभाग आणि संबंधित खात्याचे कर्मचारी यांचे मिळून संयुक्तिक पथक तयार करणार असल्याचे सांगितले. या पथकाकडून अहवाल मागवून दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.