जळगाव : पुण्यातील कंपनीत मॅनेजर असल्याचे भासवून एकाने हॉटेलमध्ये दोन महिने वास्तव्य करीत सामिष भोजन करीत दारू रीचवली मात्र बिल देण्याची वेळ येताच भामटा रफुचक्कर झाला. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयीत मयुर अशोक जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन महिने हॉटेलमध्ये मोफतमध्ये वास्तव्य
14 फेब्रुवारी 2022 पासून ते 16 एप्रिल 2022 रोजी पावेतो मयुर अशोक जाधव, (प्लॅट नं. 04, श्रीगणेश आर्किड, गंगापुररोड, रामेश्वरनगर, आनंदवल्ली, नासिक) याने पुण्यातील एका कंपनीत मॅनेजर आहे, अशी बतावणी करत हॉटेलातील एका खोलीत वास्तव्य केले. याच काळात त्याने हॉटेल मधील कर्मचार्यांचा विश्वास संपादन केला. दारु तसेच जेवणही केले. या काळात हॉटेलचे एक लाख 89 हजार 590 रुपये बिल झाले. या बिलाबाबत त्यास हॉटेलमधील कर्मचार्यांनी सांगितले असता मयुर जाधव याने चेक दिला मात्र तो वटला नाही. त्यानंतरही मयुरकडे हॉटेलमधील कर्मचार्यांनी बिलाबाबत तगादा लावला. मात्र 16 एप्रिल रोजी मयुर जाधव हा हॉटेलातील खोलीची चाबी सोबत घेवून जात पसार झाला. त्याला वारंवार संपर्क साधला मात्र त्याने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अखेर मयुर जाधव याने फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर हॉटेल मालक तजेंद्रसिंग अमितसिंग महिंद्रा (वय 65 रा. जुनी जैन कंपनी, निमखेडी रोड, जुना हायवे रोड जळगाव) सोमवार, 9 मे रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन मयुर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक ईम्रान सैय्यद हे करीत आहेत.