शिवजयंतीच्या कार्यक्रमात अमित बच्छाव यांचे प्रतिपादन
निगडी : जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखा सर्वगुणसंपन्न, पराक्रमी राजा पुन्हा होणे अशक्यच आहे. सर्व बाबींचा विचार करून त्यानुसार स्वराज्याची कार्यप्रणाली चालविणारे राजे शेतक-यांचे कैवारी होते. आजची प्रशासन व्यवस्था पाहून राजांची आठवण झाल्या शिवाय रहात नाही. शिवशाही काळात एकाही शेतकर्याने कधी आत्महत्या केली नाही. किंबहूना तशी परिस्थिती उद्भवू न देणारे जगातील सर्वोच्च आदर्शांचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अमित राजेंद्र बच्छाव बोलत होते.
भक्ती-शक्ती समुह शिल्प येथे शिवजयंती विवीध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जगदगुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बच्छाव पुढे म्हणाले की, आज शिवरायांच्या नावावर मत मिळवीली जातात,निवडणूकांपुरता त्यांच्या नावाचा उदो-उदो केला जातो. परंतू राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, त्यांची विचारप्रणाली समजून घेतली आहे का? हा ही एक मोठा प्रश्न आहे. आज मंत्रालयात आत्महत्या केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेने शेतकरी येतो, तेथे त्यांची आशाच संपते आहे. आज शेकडो वर्षांनी पुन्हा एकदा शिवबांची शासनप्रणाली समजून घेणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्र शेतक-यांच्या आत्महत्येत देशात आघाडीवर आहे. शेतकरी आत्महत्यांना दुष्काळाचे कारण देणा-या राज्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावे की शिवबांच्या काळातही दुष्काळ पडत होता. परंतू त्या परिस्थितीत शिवबांनी शेतक-यांना एक नवचैतन्याची ताकद देऊन शेतक-यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते. त्या काळात एकाही शेतकर्याने कधी आत्महत्या केली नाही.
ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ
चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव धानोरे यांनी शिवप्रतिमेचे पुजन केले. विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. मंडळाचे खजिनदार रमेश देव यांनी छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही ठळक घटना सांगितल्या. वृक्ष संवर्धनाबद्दल महाराज अत्यंत जागरूक होते. 1 झाड तोडायचे असेल तरी 100 नवी झाडे लावावीत, असा त्यांचा नियम होता. उपस्थितांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
बालशाहिरांनी सादर केले पोवाडे
थेरगावमध्ये संकल्प युवा फाउंडेशनच्यावतीने छ. शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. फाउंडेशनच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी महाराजांबद्दल प्रबोधन केले. त्यानंतर लहान मुला-मुलींची शिवाजी महाराजांबद्दल उत्कृष्ट भाषणे केली. बाल शाहीरांनी पोवाडे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सौदेकर यांनी केले. किशोर सोनवणे यांनी आभार मानले.