‘तो’ कोमातून शुद्धीवर आला अन् चायनिज बोलू लागला!

0

सिडनी। सिनेमात आपण नेहमीच बघतो की डोक्यावर एखादा आघात होतो आणि त्या व्यक्तीची स्मृती गेल्याचे आपण पाहतो. मात्र ऑस्ट्रेलियातील एका तरुणासोबत एक विचित्रच प्रकार घडला आहे. एका कार अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यात तो कोमात गेला. त्यानंतर तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तो त्याची इंग्रजी भाषा पूर्णपणे विसरला होता आणि त्याऐवजी तो फडाफडा चायनिज बोलू लागला. त्याच्यात घडून आलेल्या या बदलामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना आहे सिडनीमधली. या तरुणाचे नाव बेन मॅकमोहन असे आहे. तो 22 वर्षांचा आहे. शाळेत असताना तो चिनी भाषा शिकत होता. मात्र त्याला ती भाषा काही केल्या जमली नाही. त्यामुळे त्यानंतर तो कधीच चिनी भाषेत बोलला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भयानक कार अपघातानंतर तो कोमात गेला होता. एका आठवड्याने तो शुद्धीवर आला तेव्हा तो फक्त चिनी भाषेतच बोलू लागला.

मंदारीन भाषा बोलताना आता तो जराही अडखळत नाही. शुद्धीवर आल्यानंतर बेनला पूर्वीप्रमाणे इंग्रजीत बोलण्यास तीन दिवस लागले. चिनी भाषा येऊ लागल्यामुळे बेनसाठी रोजगाराचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत. तो आपल्या शहरात चिनी नागरिकांसाठी गाईडचे काम करण्यासह मंदारीन भाषेतील टी. व्ही. कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करू लागला आहे. मेलबर्नचा रहिवासी असलेला बेन आता वाणिज्य शाखेचे शिक्षण घेण्यासाठी लवकरच शांघायला जाणार आहे.

मंदारीन भाषेत संदेश
कोमातून शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या आशियाई नर्सला त्याने चिनी भाषेत आपल्या गळ्यत त्रास होत असल्याचे सांगितले. नर्सकडून कागद आणि पेन मागवून त्याने मंदारीन भाषेत ही चिनी भाषा आई-वडिलांसाठी संदेश लिहिला. मी लवकरच ठीक होईन, असे त्याने लिहिले होते. बेनला अचानक चिनी भाषा येऊ लागल्यामुळे डॉक्टर आणि त्याचे कुटुंबीय चकित झाले. त्यांनी बेनला इंग्रजीची सक्ती न करता मंदारीन भाषेवर प्रभुत्व मिळवण्यास सांगितले.