तो नातेवाईक अधिकारी कोण माहीत नाही?

0

मुंबई: बीकेसीतील वोक एक्सप्रेस या चायनीज रेस्टॉंरंट बेकायदा पध्दतीने बांधण्यात आले आहे. त्यावर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असले तरी याबाबत दिरंगाई एमएमआरडीएने का दिरंगाई केली याची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र याप्रकरणाला सहाव्या मजल्यावरील तो अधिकारी नातेवाईक कोण? याची आपणाला माहीती नसल्याचा खुलासा करत नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सारवासारव केली. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे माहीत असताना प्रश्न का स्वीकारला असे सांगत अध्यक्षांनी देखील पाटील यांना झोपल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. तो अधिकारी मुख्यमंत्र्यांचे सचिव असल्याची माहिती आहे. बीकेसीतील वोक एक्सप्रेस हे चायनिज रेस्टॉरंट असून या रेस्टॉरंटने बेकायदेशीर बांधकाम करून ती वास्तू स्पाईस अँण्ड ग्रेन्स या परदेशी कंपनीला चालविण्यास दिल्याबाबत सरदार तारासिंग यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

हॉटेल मालकाला मंत्र्यांकडून ‘सर’ पदवी
या प्रश्नावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या हॉटेलच्या मालकाचे एक नातेवाईक मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अधिकारी बसत असल्याचा उल्लेख करत त्या अधिकाऱ्यामुळेच ही कारवाई करण्यात येत नसल्याचे सांगत हॉटेलच्या मालकाचे नाव सांगा अशी मागणी केली. त्यास उत्तर देताना डॉ.रणजित पाटील यांनी वरील खुलासा केला. या‌वेळी कॉंग्रेसचे नसीम खान, विजय वडेट्टीवार यांनीही यावर उपप्रश्न उपस्थित केले. विरोधकांनी याप्रश्नी हॉटेल मालकाचे नाव सांगा म्हणून सातत्याने मागणी केल्याने अखेर राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी पियुष बोगींरवार सर हे या हॉटेलचे मालक असल्याचे जाहीर केले. त्यावर कायद्याचे उल्लंघन केलेल्या व्यक्तीचे नाव सर अशी उपाधी लावून घेत असल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी हरकत घेतली. त्यावर पाटील यांनी चुकून सर असा नामोल्लेख झाल्याचे सांगत पुन्हा सारवासारव केली.

अध्यक्षांनीही खडसावले
कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला न्यायालयाच्या निर्णयाची माहिती असतानाही त्याबाबत एमएमआरडीएला का कळविण्यात आले नाही? असा सवाल केला. त्यावर पाटील यांनी राज्य सरकारकडून एमएमआरडीएशी संवाद साधण्याचे राहून गेले आहे. तरीही याप्रकरणाची चौकशी करून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे सांगितले. तरीही विरोधकांकडून सातत्याने याप्रकरणी प्रश्नांचा भडीमार होत राहील्याने अखेर हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अधिक बोलता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी ही माहीती आधीच का नाही सांगितली अशी विचारणा करत हा प्रश्न राखून ठेवता आला असता असे सांगत त्यांना झापले.