नवी दिल्ली । दक्षिण आफ्रिका दौर्यातील भारतीय संघाच्या कामगिरीने सर्वांची निराशा झाली आहे. त्याचबरोबर या दौर्यास संघनिवडीवरूनही बरीच चर्चा आणि वादही झाले आहेत. भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. या विषयांवर आपले मत मांडण्यार्यांपैकी एक म्हणजे सुनील गावसकर. गावसकर यांनी आता कसोटीत धोनीची कमतरता जाणवत असल्याचे वक्तव्य केले आहे. एका वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, धोनीने एवढ्यात निवृत्त व्हायला नको होते. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला पहिल्या दोन कसोटी संघात स्थान न मिळण्याच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापले.
याशिवाय दुसर्या कसोटीमध्ये भारताने पहिल्या कसोटीत सर्वाधिक यशस्वी ठरलेला गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाच विश्रांती दिली. या निर्णयांवर आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. त्यात दुसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी मंगळवारी रोहित शर्माच्या रूपात तिसरी विकेट पडल्यानंतर पार्थिव पटेलला फलंदाजीसाठी पाठवणेही अनेकांना रुचले नाही. सुनील गावसकर यांनीही या प्रकरणी स्पष्टपणे मत मांडले आहे. गावसकर यांनी यावेळी त्यांना धोनीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले. धोनीने इतक्यात निवृत्ती घ्यायला नको होती, असेही गावसकर म्हणाले आहेत. चौथ्या दिवशी भारताने विराट कोहलीची विकेट गमावल्यावर गावसकरानी लगेचच त्यावर टिपणी केली होती. गावसकर म्हणाले की, विराट कोहली बाद झाल्यावर भारत सामना जिंकेल असे मला वाटत नाही.