तो हल्लेखोर कट्टरवादाकडे झुकलेला ब्रिटिश नागरिक

0

लंडन। ब्रिटनच्या संसदेवर हल्ला करणार्‍या त्या हल्लेेखोराची ओळख पटली आहे. चाकू घेऊन हल्ला करणारा तो हल्लेखोर कट्टरवादाकडे झुकलेला ब्रिटिश नागरिक होता. त्याला ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणाची माहिती होती, असे पंतप्रधान थेरेसा मे यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान थेरेसा मे यांनी गुरुवारी हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधित केले. त्यावेळी बोलताना थेरेसा म्हणाल्या की, त्या हल्लेखोराची माहिती मिळाली आहे. तो ब्रिटीश नागरिक होता. कट्टरवादाच्या संशयावरून एमआय फाईव्ह या ब्रिटिश गुप्तचर संस्थेने त्याची चौकशीही केली होती. मात्र, त्यावेळी त्याला सोडून देण्यात आले होते. तो हल्लेेखोर इस्लामिक दहशतवादाकडे आकृष्ट झाला होता. त्याला सुरक्षा यंत्रणांची चांगली माहिती होती. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत आठ संशयिताना अटक करण्यात आली आहे. संसद परिसरातील हल्ल्यानंतर लंडन व बर्मिंगहॅममध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हल्ल्यानंतरही संसदेचे कामकाज सुरळीत चालेल, असे थेरेसा यांनी हल्ल्याच्या काही वेळानंतर जाहीर केले होते. दरम्यान, स्कॉटलंड यार्ड कार्यकारी आयुक्त तथा दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मार्क रॉवली म्हणाले, ब्रिटन दहशतवादाला कदापि स्थान देणार नाही.