त्यांच्या खात्यात जमा होणार कोटी रुपये

0

मुंबई । जे लोक खात्यात 15 लाख रुपये जमा होण्याची वाट पाहत आहेत, त्यांचे स्वप्न कदाचित सत्यात उतरण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस पुढील काही दिवसांमध्ये 490 कोटी ट्रान्सफर करणार आहेत. गुंतवणूक केली असता फसवणूक होऊन पैसे बुडालेल्या गुंतवणूकदारांनाच ही रक्कम मिळणार आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम वाटण्याचा आदेश पोलिसांना न्यायालयाकडूनच मिळाला आहे. आपल्या गुंतवणूकदारांना फसवणार्‍या 11 मोठ्या कंपन्यांची संपत्ती विकून ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

फसवणूक झालेल्यांना रक्कम वाटण्याचे न्यायालयाचे आदेश
यामधील काहींचे 50 हजार तर काहीजणांचे 20 ते 25 लाख बुडाले आहेत. या 11 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्यांनाच ही रक्कम मिळणार आहे. पोलिसांनी या कंपन्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. ज्या 11 कंपन्यांकडून पोलिसांनी ही रक्कम मिळवली आहे, त्या कंपन्यांनी 1998 ते 2005 च्या दरम्यान गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. इतरही कंपन्यांबाबतीत लवकरच न्यायालयाकडून असाच आदेश मिळेल अशी पोलिसांना अपेक्षा आहे. हे पैसे वाटण्याची प्रक्रिया पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे. यासाठी भायखळ्यात एक स्पेशल सेलही तयार करण्यात येत आहे.

भायखळा वाहतूक पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बिल्डिंगमध्येच वाटप
मुंबई पोलिसांनी रक्कम वाटण्यासाठी अनेक जागांची पाहणी केली, मात्र अखेर भायखळा वाहतूक पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बिल्डिंगमध्येच सुरू करण्याचे ठरवले. याठिकाणी गुंतवणूकदारांची गर्दी आवरण्यासाठी उपलब्ध जागा असल्याने ही जागा निवडण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीपी रँकचा अधिकारी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहे. याअंतर्गत एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि आठ शिपायी असणार आहेत.

सध्या 5 कोटी 63 लाखांचे वाटप सुरू
सध्या पोलीस दोन केसमध्ये मिळालेली 5 कोटी 63 लाखांची रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करत आहेत. रक्कम मिळवण्यासाठी गुंतवणूकदार जीपीओजवळील डीजीपी झोन वन कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत जात आहेत. गुंतवणूकदारांना रक्कम मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी लागत आहे. तसंच ज्या खात्यावर रक्कम जमा करायची आहे त्याचा कॅन्सल चेकही द्यावा लागत आहे.