त्यांना नावापुढे डॉक्टर लावण्याचा अधिकारच नाही!

0

रायपूर ।  एमबीबीएस, एमडी, एमएससहीत बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीएनवायएस, फिजिओथेरपी अशा कोणत्याही वैद्यकीय पदवीधारकाला आपल्या नावापुढे डॉक्टर लावता येत नाही. त्याची तशी पात्रता नाही. त्याला परवानगी नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने आयुष महाविद्यालयाच्या माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केली आहे. नियमानुसार केवळ पीएचडी अर्हताधारकच स्वत:च्या नावापुढे डॉक्टर लिहिण्यास पात्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नावापुढे आपली वैद्यकीय पदवी लिहावी
आरटीआयमध्ये दिलेल्या महितीनुसार, एमबीबीएस, एमडी, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीएएमएस, एमडी, एमएस आयुर्वेद, बीएचएमएस, बीएनवायएस यांना उपरोक्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लिहिण्याचा तसेच स्वत:ला डॉक्टर म्हणून सांगण्याचा कोणताही नियम नाही. वैद्यकीय पदवीधारकांनी नाव लिहून त्यापुढे आपली वैद्यकीय पदवी लिहायला हवी. तसेच सेवाचिन्ह वापरायला हवे. मात्र देशातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंटर्नशिपआधीच वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आपल्या नावाच्या सुरुवातीला डॉक्टर लिहायला सुरुवात करतात. मात्र असे लिहिण्याला परवानगी नसल्याची माहिती आता पुढे आली आहे.

वाद कायम
एमबीबीएस, एमडी, एमएस पदवीधारकांची नोंदणी करणारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआई), बीडीएस, एमडीएस डॉक्टरच्या नोंदणी करणार्‍या डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया (डीसीआई) तसेच बीएएमएस पदवीधारकांची नोंदणी करणारी सीसीआईएम या संस्थेच्या नियमानुसार नावापुढे डॉक्टर लिहिण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नसून याबाबतचा वाद अद्याप कायम आहे.

बोगस डॉक्टर घेतात गैरफायदा
ग्रामीण भागासह खेडोपाड्यात आणि शहरांमध्ये अनेक जण नावापुढे डॉक्टर लिहितात. त्यामुळे अनेक जण तपासणी करण्यासाठी गेल्यावर डॉक्टरांकडील वैद्यकीय शाखेच्या डिग्रीची चाचपणी करत नाहीत. परिणामी अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर त्यांचा गैरफायदा घेत आहेत. बोगस डॉक्टरांमुळे अनेक जणांच्या जीवित्ताला धोकाही निर्माण झाला आहे. तसेच अनेकांवर मृत्यूची वेळही ओढवली आहे.

फक्त पीएचडीधारकच पात्र
विवीच्या नियमानुसार कोणत्याही ग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्यूएट विद्यार्थ्यांना नावापुढे डॉक्टर लिहिण्यास परवानगी दिलेली नाही. नियमानुसार फक्त पीएचडी अर्हताधारकच नावापुढे डॉक्टर लिहिण्यास पात्र आहेत.
प्रा. के.एल. तिवारी, रजिस्टार, आयुष विश्‍वविद्यालय

आयुषच्या नियमांबद्दल माहिती नाही
आयुष विश्‍वविद्यालयाच्या या नियमांबद्दल काही माहिती नाही. मात्र राज्याच्या वैद्यकीय संचनालयाच्या अखत्यारीत जी महाविद्यालये येतात आणि त्यातून जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतात त्यांना डॉक्टर ही पदवी आपल्या नावापुढे लावायची परवानगी आहे.
प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य