अॅड. प्रकाश आंबेडकरांचे भाकित
पुणे : मराठा आंदोलनासंदर्भात नोव्हेंबरअखेर निकाल येणार आहे. तो काहीही लागला, तरी त्यानंतर महाराष्ट्रात मोर्चे-प्रतिमोर्चे निघतील, असे भाकित भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले. बहुजन समाजाच्या विकासासाठी आरक्षणाच्या टक्केवारीवर अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.
बहुजन वंचित आघाडीत सहभागी होण्यासाठी दलित युवक आंदोलनाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, अॅड. विजय मोरे, सचिन बगाडे, लक्ष्मण आरडे, जोशीला लोमटे, शीतल साठे, डॉ. इंद्रकुमार भिसे उपस्थित होते.
इंग्रजांनी समाजात फूट पाडण्यासाठी ‘फोडा आणि झोडा’ ही नीती अवलंबली. सध्याचे राज्यकर्तेही सत्तेसाठी हीच नीती अवलंबत असून त्याचा समाजव्यवस्थेवर परिणाम होत आहे. लढाऊ विमानांच्या घोटाळ्यानंतर याच प्रश्नावर भाजप सरकारला घेरले आहे. त्यामुळेच शासनाने राम मंदिराच्या नावाखाली नवीन राजकारण सुरू केले आहे, एखाद्या प्रश्नाला भावनिक करायचे आणि नंतर मैदानातून पळ काढायचा हीच त्यांची पद्धत आहे. मात्र, आपला समाज दुर्दैवाने त्यांच्या या भावनिक खेळाला बळी पडत असून समाजाच्या विकासासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुजन समाजाला आरक्षणात वाटा मिळाला असला, तरी या समाजाच्या विकासासाठी आतापर्यंतच्या कोणत्याही शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन या समाजाच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात टक्केवारीवर तरतूद करण्याची आवश्यकता आहे.