‘त्या’ अधिकार्‍यांचे पगार थांबविण्याचे आदेश

0
5 महिने माहिती देण्यास केली टाळाटाळ
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना स्वच्छ अभियाना अंतर्गत केलेल्या इंदोर शहर अभ्यास दौर्‍याचा खर्च गेले 5 महिने देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांचे पगार थांबविण्याचे आदेश मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी नगरपरिषदेचे लेखापाल यांना दिल्याने संबधीत अधिकारी हादरले आहेत. देशात स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळणार्‍या इंदोर शहरातील स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नागरिक आणि अधिकारी यांचे पथक अभ्यास दौर्‍यासाठी दि 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या काळात गेले होते. या दौर्‍यात 34 सदस्यांचा समावेश होता.
मुख्य लेखापालांना दिल्या सूचना
दौर्‍यात आरोग्य विभागाचे 2 अधिकारी आदी वसूल विभागाचे, 1 ज्येष्ठ अधिकारी यांच्याकडे नगरपालिकेचे लेखापाल ज्ञानेश्‍वर मोहिते यांनी मोठमोठ्या रक्कमांची उचल दिली होती. दौर्‍यानंतर लगेचच खर्चाचा तपशील आणि अहवाल नगरपरिषदेकडे सादर होणे अपेक्षित असताना गेले पाच महिने खर्चही नाही आणि अहवालही सादर केला गेला नाही. अनेक वेळा लेखापाल आणि मुख्याधिकारी यांनी मागणी करूनहि अधिकार्‍यांनी हिशोब देण्यास टाळल्याने अखेर मुख्याधिकारी आवारे यांनी संतप्त होऊन लेखापाल ज्ञानेश्‍वर मोहिते यांना संबधीत अधिका-यांचे पगार थांबिवण्याचे आदेश दिल्याने खळबळ उसळली आहे. या दौर्‍यावर गेलेल्या पदाधिकार्‍यांनी याबाबत काहीही लेखी अहवाल नगरपरिषदेकडे सादर केलेला नाही. तसेच इंदोर शहरातील स्वच्छता अभियानाची माहिती शहर वासियांना दिलेली नसल्याने हा अभ्यासदौरा होता कि सहल होती याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.