एनसीसी कंपनीला आदेश
पुणे : चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम आठवडाभरात सुरू करण्याचे आदेश हैदराबाद येथील एनसीसी कंपनीला देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पाला मान्यता दिली आहे, त्यामुळे चांदणी चौकातील उड्डाणपूल व रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल व तेथील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला. संबंधित वर्क ऑर्डर भारतीय राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने एनसीसी कंपनीला दिली.
जून 2020पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प
पहिल्या टप्प्यात 397 कोटी रुपयांची कामे पूर्ण करावीत, असे आदेश एनसीसी कंपनीला देण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येत्या आठवडाभरात हे काम सुरू होईल. चांदणी चौक उड्डाणपुलाचे हे काम एकूण 895 कोटी रुपयांचे आहे. त्यासाठी लागणारे भूसंपादन महापालिकेने करायचे आहे. महापालिकेने एकूण 85 टक्के भूसंपादन यापूर्वीच केले आहे. उरलेल्या 15 टक्के भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. हा प्रकल्प दीड वर्षांत म्हणजे जून 2020 पर्यत पूर्ण होईल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला आहे.
वाहतूक होणार गतिमान
100 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय केंद्रीय महामार्ग खाते काम सुरू करण्यास तयार नव्हते. पालकमंत्री या नात्याने गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. मुंबई पुणे, हिंजवडी आयटी पार्क, बंगलोर हायवे या रस्यावरील वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडेल.