पुणे । महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांना नागरी सुविधा त्वरीत उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. तसेच भविष्यात अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी आताच ठोस पावले उचला, असेही शिवतारे यांनी सांगितले. आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी, देवाची उरळी येथील विकासकामांबाबत शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस याठिकाणी आढावा बैठक पार पडली. यावेळी संबधित विभागांच्या अधिकार्यांशी त्यांनी चर्चा करून त्यांनी सूचना दिल्या. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आदी कामे गतीने होणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदीस्त गटारे बांधावीत. या भागातील अॅमिनिटी स्पेसमध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण तयार करणे, जॉगिंग ट्रॅक बनविणे तसेच डायलेसिस केंद्र तयार करणे आवश्यक आहे. या कामांसाठी आमदार निधीतून तरतूद करण्यात येईल, असे शिवतारे यांनी सांगितले.
लवकरच पालिकेत बैठक
पालिकेतील समाविष्ट गावांमध्ये अनधिकृत नळजोडणीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्याची पाहणी करून नळजोडणी अधिकृत द्यावी. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास सर्वांना पुरेसे पाणी मिळेल. त्यासाठी मिटर लावणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिकार्यांना केल्या. तसेच या भागातील समस्या व विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत पुणे महानगरपालिकेमध्ये लवकरच बैठक घेऊन सविस्तर आढावा घेण्यात येईल, असेही शिवतारे यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकांवर त्वरित कारवाई करा
विकास कामांची सुरुवात तात्काळ करून ही कामे गतीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आंबेगाव खुर्द व आंबेगाव पठार या भागात असणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच या भागात झालेल्या बांधकामांची पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिकार्यांना केल्या. तसेच अपुर्ण कामे तात्काळ पुर्ण करण्याबरोबरच मंजूर कामे त्वरीत सुरू करावीत, असे सांगून या भागातील समस्या व विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत पुणे महानगरपालिकेमध्ये लवकरच बैठक घेऊन सविस्तर आढावा घेण्यात येईल, असेही शिवतारे यांनी पुढे सांगितले.